
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मार्मिक’च्या 65व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे लक्ष वेधले. सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावरती देशाची लोकशाही तडफडतेय, त्यात लक्ष घाला, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरन्यायाधीश गवई यांना आवाहन केले.
65 वर्षांपूर्वी एका व्यंगचित्रकाराने ‘मार्मिक’ नावाची एक ठिणगी टाकली आणि त्यातून शिवसेना नावाचा वणवा पेटला. आणि तो असाकाही पेटला की त्या वणव्यात मराठी द्वेष्टे, महाराष्ट्र द्वेष्टे जळून खाक तर झालेच. पण त्या शिवसेनेने पुढे जाऊन मुंबईतले आणि महाराष्ट्रातले हिंदू सुद्धा वाचवले. त्या ठिणगीचा, त्या ‘मार्मिक’चा आजचा हा 65 वा वर्धापन दिन आहे. मी आणि ‘मार्मिक’ एका वयाचे, त्यामुळे कितवा ते मी कधीच विसरू शकत नाहीत. पण ‘मार्मिक’चं काम अजूनही संपलेलं नाही. आजही आपले कार्यकारी संपादक अत्यंत चांगल्या पद्धतीने काम सांभाळत आहेत. त्यावेळची जी काही संपूर्ण वाटचाल होती, मुंबई महाराष्ट्राला मिळाली म्हणण्यापेक्षा मराठी माणसाने मिळवली. पण मुंबईमध्येच मराठी माणूस उपरा झाला होता. आणि मग शिवसेनेचा जन्म झाला. पण तशीच परिस्थिती परत एकदा निर्माण केली जातेय. अजूनही मुंबईचा लचका, महाराष्ट्राचा लचका तोडता येईल का? याचा प्रयत्न मधे-मधे चोची मारून केला जातोय. मग तो हिंदी सक्तीच्या निमित्ताने असेल, किंवा मुंबईचं महत्त्वं मारण्याचा निमित्ताने असेल, हे प्रयत्न काही थांबत नाही किंवा हे प्रयत्न करणाऱ्यांना जोपर्यंत आपण संपवत नाही तोपर्यंत ‘मार्मिक’ आणि शिवसेनेचं काम कधी थांबणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.
“…जर का वेळेवर न्यायाचं पाणी नाही दिलंत तर, देशातली लोकशाही मरेल”
एकूण वातावरण असं आहे की, नेमकं बघायचं कुठे? शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. पण आमचं लक्ष भरकटवून कुठे नेलं जातंय? कबुतरांकडे, दुसरीकडे कुठे? कुत्र्यांकडे. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले की, दिल्लीमधील भटक्या कुत्र्यांना पकडा. मग त्याच्यावर देशभरातून तीव्र नाराजी व्यक्त झाली. मनेका गांधी म्हणाल्या, जर का असे कुत्रे पकडले तर दिल्लीमध्ये झाडावरती माकडं आहेत ती खाली येतील. ती माकडं आली आहेत, ऑलरेडी संसदेत पोहोचलीत. तसा व्हिडिओ गेल्या वर्षी जयराम रमेश यांनी ट्विट केला होता, खुर्चीवर माकड बसलेल्याचा. पण विशेष म्हणजे आपले सरन्यायाधीश भूषण गवईसाहेब, त्यांना खरंच धन्यवाद द्यायचे आहेत की, देशभरातून भटक्या कुत्र्यांच्या त्या निर्णयाच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झालीय. आणि त्यांनी मत व्यक्त केलं की जरी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या खडंपीठाने याबद्दल निर्णय दिलेला असला तरी मी स्वतः त्यात लक्ष घालेन. याला म्हणतात कर्तव्यदक्ष सरन्यायाधीश. त्याच सरन्यायाधीशांना विनंती करतोय की, आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावरती देशाची लोकशाही तडफडतेय. तीन वर्षे झाली, चार वर्षे झाली, कधी प्राण सोडेल सांगता येत नाही. एक झाले, दोन झाले, तीन झाले आता आपण चौथे सरन्यायाधीश बसलेले आहात, त्या लोकशाहीच्या तोंडात जर का वेळेवर न्यायाचं पाणी नाही दिलंत तर, देशातली लोकशाही मरेल. त्याच्यामुळे खंडपीठ कुठलंही असलं तरी आपण त्यात देखील लक्ष घाला ही विनंती आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“मतांची चोरी राहुल गांधींनी उघड केली तरी सगळं छान चाललेलं आहे”
बाकी सगळं ठीक आनंदात चाललेलं आहे, नोकऱ्या नाहीये तरी, सगळं चांगलं चालेललं आहे, ट्रम्प तिकडनं दम भरतोय तरीसुद्धा चांगलं चाललेलं आहे, पहेलगामच्या हल्ल्याचं काय झालं? त्याची उत्तरं द्यायला सरकारकडे वेळ नाही तरीसुद्धा चांगलं चाललेलं आहे, मतांची चोरी राहुल गांधींनी उघड केली तरी सगळं छान चाललेलं आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. या सगळ्या छान चाललेल्या वातावरणात आपल्या राज्याची जी काही संस्कृती आहे, कारण आता संस्कार, संस्कृती हे शब्द इतिहासजमा व्हायला लागलेत. आजचा हा कार्यक्रम त्यासाठी ठेवला आहे. या कार्यक्रमाची शिफारस मला संजय राऊत यांनी केली. त्यामुळे हा कार्यक्रम आवडला, नाही आवडला त्याला जबाबदार संजय राऊत असतील. मात्र, कार्यक्रम चांगला आहे, असे उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.
“56 इंचाची छाती तिला जरा थोडी टाचणी मारा, विंचवाचं विष असं चाढेल की…”
आता विसरत चाललोय, एक-एक संस्कृती पूर्वी होत्या सगळ्या गोष्टी. मग ते कडकलक्ष्मी असायची, वासुदेवाची गाणी, पोतराजाची गाणी, यल्लमादेवीची गाणी, भलरी गीतं, कोळी गीतं, कोकणातील लोकगीतं, आदिवासींची गाणी ही सगळी आता कानावर पडण्याचं बंद झालेलं आहे. जसं ‘मार्मिक’ने काम केलं. व्यंगचित्राच्या माध्यमातून जसं बाळासाहेबांनी काम केलं. व्यंगचित्र म्हणजे नुकसतं ओरबाडायचं नाही. तर मिश्किलपणे, ‘मार्मिक’पणे बरोबर समाजातली जी काही विकृती असेल आणि अनिष्ट प्रथा-परंपर असेल त्याच्यावरती बोट ठेवायचं. हेच काम आपल्या साधू-संतांनी केलं. लहानपणी ते भारूड आता आपण बोलतो ना, विंचू चावला… एकनाथांचं… म्हणजे या नाही हं खऱ्या एकनाथांचं… तोतया एकनाथाचं नाही. भारूड आणि ते शाहीर साबळे गायचे तेव्हा विंचू चावला… त्यात काम, क्रोध शब्द आहेत… विंचू चावला… म्हणजे काय की हा असा जो काय विंचू आहे मग तो सत्तांध असेल, कोणही असेल, कोणत्याही गोष्टीची हाव असणं, लोभ असणं, त्यातून माणसामध्ये अहंकार येतो. आणि त्या अहंकाराने विंचू चावल्यासारखा वेडापिसा होतो की चुकीचे निर्णय घ्यायला लागतो. आणि मग त्याच्यावरती उतारा सुद्धा एकनाथ महाराजांनी सांगितला आहे की, तमो गुण मागे सारा म्हणजे अहंकार आहे ना, 56 इंचाची छाती तिला जरा थोडी टाचणी मारा. तो गर्व तुमचा खाली येऊ द्या. नाहीतर विंचवाचं विष असं चाढेल की, त्यातच तुमचा बळी जाईल, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
“तोंडाने रामराम करायचं आणि पैसे देऊन धुमाकूळ घालायचा”
पूर्वी एक पिक्चर आला होता दाम करी काम. तो सुद्धा कोणाला माहिती नसेल. त्यात एक गाणं होतं वासुदेवाची ऐका वाणी… हल्ली वासुदेवच दिसत नाही. पूर्वीचे वासुदेव वेगळे होते, नाक्यावरचे उभे राहणारे वासूदेव वेगळे असतात. त्यांची गाणी वेगळी, यांची गाणी वेगळी. पण त्यातला वासुदेव जे गाणं म्हणतो, वासुदेवाची ऐका वाणी… जगात नाही राम रे. आता पिक्चर काढला असता तर, जगात नाही राम म्हटल्यानंतर हे जे काही नवं हिंदुत्ववादी आलेत त्यांनी बंदी घातली असती चित्रपटावर, हा राम नाही म्हणतो. पण पुढचं वाक्य महत्त्वाचं आहे, तेच तुम्ही करताहेत. दाम करी काम… दाम करी काम रे येड्या दाम करी काम… तेच तर चाललंय म्हणजे तोंडाने रामराम करायचं… जय श्रीराम आणि पैसे देऊन धुमाकूळ घालायचा. अशा सगळ्या नासलेल्या बरबटलेल्या, बुरसटलेल्या यांच्या कारभारामध्ये तरुण मुलं महाराष्ट्राची संस्कृती घेऊन आणि त्याच्यामध्ये नवीन गोष्टी नव्या पद्धतीने आणून पुढे येताहेत. त्यांचं कौतुक करायला आपण सगळे इथे जमलेले आहात, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मार्मिकला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.