मुंबईत मिंध्यांनी उत्तर-पश्चिमची जागा ढापली नसती तर शिवसेना-महाविकास आघाडीचा 5-1 असा विजय झाला असता. कोकणातही तेच झाले. विनायक राऊत यांच्या मतदारसंघात काय झालेय हे आम्ही पाहिलंय. आगामी निवडणुकीतही पैशाचा पाऊस पडेल. पण निवडणुकीतील पैशाच्या वापराविरोधात कोर्टात जाणार असल्याचा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला.
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी रंगशारदा येथे आयोजित बैठकीत शिवसेना पदाधिकाऱयांना मार्गदर्शन केले. लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून पैशाचा धबधबा पडला. आतादेखील तोच प्रकार घडण्याची शक्यता असल्यामुळे जागरूक राहून काम करा, असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले. दहा वर्षांत मोदींनी शिक्षकांसाठी काय केले, असा सवालही त्यांनी केला. पुढचे सरकार आपले असणार आहे. ऑक्टोबरला निवडणूक लागली की हे पीक तरारून वर आले पाहिजे. यासाठी आता उगवलेली तणं उखडून फेकावी लागतील आणि नव्याने पीक घ्यावे लागेल, असेही ते म्हणाले.
यादी येताच कामाला लागा
शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठी एका शाखेला फक्त 30 शिक्षक आणि 200 ते 250 पदवीधर आहेत. त्यामुळे यादी येताच जोमाने कामाला लागा. ज्यामुळे आपण 100 टक्के निकाल आपल्या बाजूने घेऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ही निवडणूक वैयक्तिक संपका&वर होते. त्यामुळे यादी येताच कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी केले.