शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी उद्धव ठाकरे पुन्हा मराठवाडय़ात

567

ओल्या दुष्काळाने शेत उद्ध्वस्त झाल्याने हवालदिल झालेल्या बळीराजाला धीर देण्यासाठी, त्याला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्यात दौरे करत आहेत. थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिलासा देत आहेत. रविवारी त्यांनी मराठवाडय़ातील नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली. आता मंगळवारी ते पुन्हा मराठवाडय़ात जाऊन बळीराजाच्या व्यथा जाणून घेणार आहेत.

शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत द्या अशी जोरदार मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. रविवारी त्यांनी मराठवाडय़ातील संभाजीनगर येथे जाऊन अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतांची पाहणी केली. अनेक शेतकऱ्यांनी त्यांना उद्ध्वस्त झालेल्या पिकांचे अवशेष दाखवले. सोयाबीन, कापूस, मका, बाजरी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अन्नदात्याच्या पाठीशी शिवसेना सदैव होती आणि राहील असे सांगत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना धीर दिला.

असा असेल दौरा

उद्धव ठाकरे हे मंगळवारी सकाळी 10 वाजता मुंबईहून नांदेडकडे प्रयाण करणार आहेत. सकाळी 11 वाजता ते नांदेड येथे पोहचतील. तेथून 30 किलोमीटरवरील लोहा येथे त्यांचा पहिला दौरा होईल. तेथील नुकसानग्रस्त शेतशिवारांची ते पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतील. तेथून नंतर पावणेबारा वाजता त्यांचा कंधार येथे दौरा होईल. कंधार येथून पुढे अहमदपूर आणि गंगाखेड येथे त्यांचा पाहणी दौरा होईल.

दुपारी साडेतीन वाजता उद्धव ठाकरे हे गंगाखेड येथून माजलगावकडे रवाना होणार आहेत. माजलगावनंतर गेवराई येथे जाऊन तेथील शेतांची पाहणी केल्यानंतर सायंकाळी 7 वाजता ते पुन्हा संभाजीनगरला रवाना होतील आणि तेथून नंतर साडेआठच्या सुमारास मुंबईकडे प्रयाण करतील अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या