
कॉन्ट्रॅक्टरसाठी नाशिकच्या तपोवनमधली झाडं कापली जाताहेत आणि त्याला कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून कुंभमेळ्याचं कारण दिलं जातंय. याचा अर्थ असा की भाजपचं हिंदुत्व हे थोतांड आहे. काल परवाच आपल्या पंतप्रधानांनी अयोध्येच्या मंदिरावरती रामध्वजा फडकवली. म्हणजे तिकडे जाऊन राम राम करायचं आणि नाशिकमध्ये मुंह में राम आणि बगल में अदानी असं यांचं काम आहे की काय? असा सवाल उपस्थित करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केला. उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
आज देखील नाशिकचा पालकमंत्री नेमला का जात नाहीये? हे एक कोडं आहे आणि त्या कोड्याचं उत्तर कुंभमेळ्याच्या एकूण होणाऱ्या खर्चामध्ये आहे का? हे आपल्याला शोधावं लागेल. तो विषय वेगळा झाला त्याच्यात आता मला जायचं नाहीये. मात्र, या नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधूग्राम म्हणून जे काही होणार आहे त्यासाठी तपोवन हे नष्ट करण्यात येणार आहे. तपोवन म्हणजे जिथे प्रभू श्रीरामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण हे काही काळ वास्तव्यास होते अशी आपली मान्यता आहे. प्रभू श्रारीमचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ज्या काही मोजक्या जागा आपल्या देशात ओळखल्या जातात त्याच्यापैकी तपोवन ही जागा आहे. खरं म्हटलं तर इकडे एक श्रद्धेचं ठिकाण निर्माण करण्यात यायला पाहिजे होतं. कारण तिथे जवळपास ६० प्रकारच्या वेगवेगळ्या प्रजातीची झाडं आहेत. त्यातली अनेक ही औषधी वनस्पती आहेत. थोडक्यात या तपोवनाने आपल्याही पेक्षा जास्त कुंभमेळे अनुभवलेले असतील. आणि मुख्य म्हणजे या तपोवनामध्ये जे काही साधूग्राम म्हणून करण्यात येणार आहे या साधूग्राम करण्याला आमचा विरोध नाहीये. पण तपोवनात करण्यात येणार आहे त्याला मात्र आमचा आक्षेप आहे. याचं कारण ही झाडं कापली जाणार आहेत. मग प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुण्य झालेली ही भूमी तुम्ही तिकडे साधूग्रामसाठी झाडं कापणार, तिकडे साधूंची व्यवस्था करणार पण त्याच्यानंतर काय करणार? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर झाडं लावणार असाल तर मग गेल्यावेळेला जी जागा वापरली होती त्याच जागेमध्ये साधग्राम का करत नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. गिरीश महाजन म्हणालेत एक झाड कापलं तर दहा झाडं लावणार. एवढी जागा जिथे असेल तिकडेच जर जागा रिकामी असेल तर तिथेच साधूग्राम का नाही करत? म्हणजे आहे ते मारून टाकायचं आणि मारल्यानंतर पुन्हा तिथे नव्याने झाडं लावू अशी लोणकढी थाप मारायची हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आता कुंभमेळ्याचं जरी कारण देण्यात येत असलं तरीदेखील माझ्या हातात एका टेंडरची कॉपी आली आहे. त्याचं पहिलं पान आहे, ज्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की तिथे नंतर कॉन्फरन्स हॉल, कन्व्हेन्शन हॉल वैगरे अशा काही गोष्टी केल्या जाणार आहेत. कॉन्ट्रॅक्टरसाठी ही झाडं कापली जाताहेत आणि त्याला कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून कुंभमेळ्याचं कारण दिलं जातंय. याचा अर्थ असा की भाजपचं हिंदुत्व हे थोतांड आहे. काल परवाच आपल्या पंतप्रधानांनी अयोध्येच्या मंदिरावरती रामध्वजा फडकवली. म्हणजे तिकडे जाऊन राम राम करायचं आणि नाशिकमध्ये मुंह में राम आणि बगल में अदानी असं यांचं काम आहे की काय? असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. काही म्हणी आपल्याला बदलल्या पाहिजेत. मुंह में राम बगल में छुरी असं आपण म्हणत होतो, आता रामाच्या नावाने ही जागा अदानी हा एक शब्द झालाय कॉन्ट्रॅक्टरचं प्रतिक म्हणून, ही जागा कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालण्यासाठी आता कुंभमेळ्याचं कारण पुढे करून तुम्ही तिथली झाडं कापताहेत किंवा नष्ट करताहेत. हा सरळ सरळ तिथल्या जनतेचा आरोप आहे आणि त्याच्याशी मी सहमत आहे. तिथल्या जनतेचं कोणी ऐकत नाहीये, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपसह सत्ताधारी महायुतीवर हल्ला चढवला. आज देखील नाशिकचा पालकमंत्री नेमला का जात नाहीये? हे एक कोडं आहे आणि त्या कोड्याचं उत्तर या कुंभमेळ्याच्या एकूण होणाऱ्या खर्चामध्ये आहे का? हे आपल्याला शोधावं लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मंत्री नुसते गरागरा फिरताहेत. पण हे ना धड शेतकऱ्यांचं ऐकत आहे ना शहरातल्या नागरिकांचं ऐकत आहेत. वारेमाप नुसता पैसा उधळला जातोय. हा पैसा येतो कुठून? याचं उत्तर कोणाकडेच नाही. ते दिसतंय सगळ्यांना. त्यांच्या मित्रपक्षांमध्येच साठमारी सुरू झाली आहे. एकमेकांवरती धाडी टाकून उघड उघड पैसे दाखवले जाताहेत तरीसुद्धा सगळे चिडीचूप आहेत. तर हे भाजपचं थोतांड आहे. आणि म्हणून मुँह में राम आणि बगल में अदानी असं भाजपचं हिंदुत्व आहे. या हिंदुत्वाला आम्ही मान्यता देऊ शकत नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.






























































