बोटावरची ‘शाई’ नाही ‘लोकशाही’ पुसली जातेय; निवडणुकीतील घोळावरून उद्धव ठाकरे यांचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत महापालिका निवडणुकीतील गोंधळ आणि गैरप्रकारांवरून निवडणूक आयोग आणि सरकारला धारेवर धरले. हा लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार आहे. मोदींना जे वन-नेशन वन-इलेक्शन पाहिजे ते एवढ्याचसाठी पाहिजे की, एकावेळेला सगळीकडे गोंधळ घालून वाट्टेल ते करा पण सत्ता काबीज करा. आज देखील काही ठिकाणी दुबार नोंदणीची नावं समोर येत आहेत. काहींची मतदान केंद्रे गायब आहेत. शाई पुसली जातेय. ही बोटावरची शाई नाही लोकशाही पुसली जातेय, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

मुंबईसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकांसाठी आज मतदान होत असताना अनेक ठिकाणी मोठा गोंधळ उडाला आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. हा लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार आहे. मोदींना जे वन नेशन वन इलेक्शन पाहिजे ते एवढ्याचसाठी पाहिजे की एकावेळेला सगळीकडे गोंधळ घालून वाट्टेल ते करा पण सत्ता काबीज करा. लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेला कळलं. त्याच्यानंतर दुबार मतदारांचे आम्ही गठ्ठेच्या गठ्ठे त्यांना दिले. त्यानंतरही आज देखील काही ठिकाणी दुबार नोंदणीची नावं समोर येत आहेत. काहींची मतदान केंद्रे गायब आहेत. शाई पुसली जातेय. ही बोटावरची शाई नाही लोकशाही पुसली जातेय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

साधारणतः मतदानाचा दिवस आणि मतमोजणीचा दिवस हे दोन्ही वेगळे दिवस असतात. फार पूर्वी मतदान झाल्यानंतर तत्काळ मतमोजणीला सुरुवात व्हायची. आणि मध्यरात्री किंवा दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत मतमोजणीचे निकाल जाहीर व्हायचे. जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत मतपेट्या उघडल्या जात नाहीत. त्यात पोस्टलसुद्धा आले, असे सांगत उद्धव ठाकरे यांने निवडणूक अधिकाऱ्याच्या आदेशाचे एक पत्र समोर आणले. निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाग क्रमांक २०० ते २०६ यांचे ८ जानेवारी २०२६ चे पत्र आहे. मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी सुरळीतपणे पार पाडण्या करता उक्त दिनांकास झालेले टपाली मतदान हे मतदानाचा लिफाफा तपासून त्यांनी… आज दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी तीन वाजता सदर टपाली मतपत्रिकेच्या पेट्या स्ट्रँग रुममधून बाहेर काढण्यात येणार आहे. तरी त्या करता आपण किंवा टपाली मतपत्रिके करिता नेमणूक केलेला प्रतिनिधी यांन नमूद वेळेत उपस्थित राहण्याकरिता आपल्या सर्वांना सूचना देण्यात याव्यात, असे या आदेशात म्हटल्याचे उद्धव ठाकरे यांनी समोर आणले.

“निवडणूक आयुक्तांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे”

हे काय चाललंय? कोणता प्रकार? किंवा कसली लोकशाही आहे? संविधान म्हणतेय मतदान करा आणि निवडणूक आयोग म्हणतंय करूनच दाखवा, असा मला एक मेसेज आलेला आहे. मुख्यमंत्री असं म्हणालेत की, हे रडीचा डाव खेळताहेत. पण मग मुख्यमंत्री त्यांची घरगडी निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करताहेत का? की निवडणूक आयुक्तांना काही कामच नाहीये. हा सगळा प्रकार जो चाललेला आहे, धाकदपटशाचा प्रकार करून पाहिला. त्याच्यानंतर पैसे वाटपाचा प्रकार करून पाहिला, तेही उघडकीस आलं आहे. यावेळेला सोशल मीडियातून बऱ्याच गोष्टी उघड झालेल्या आहेत. टीव्ही चॅनेलमधून सुद्धा बऱ्याच गोष्टी उघड झालेल्या आहेत. अगदी परवा मी आणि राज ठाण्याला गेलो होतो. आमच्या उमेदवारांनासुद्धा कोटी-कोटींची ऑफर देऊन त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. सगळ्याचं साम, दाम, दंड, भेद एवढी खा-खा कशासाठी सुटलीय यांना? महापालिकेची निवडणूक, नगरपरिषदेच्या निवडणुका, महायुतीकडे कर्तृत्व काही नाहीये म्हणून वाट्टेल ते करा. तिकडे गणेश नाईकांकडे त्यांचं मतदान केंद्रच फरार झालं. त्यांच्या टांगा दुखल्या फिरून फिरून, चार तास लागले त्यांना. ही मंत्र्याची हालत आहेत. टांगा पलटी नाही झाला, पण खेट्या खालून त्यांच्या टांगा दुखल्या. आता डोक्यावर हात मारावा की पाय चेपत बसावे हा गणेश नाईकांसमोरचा प्रश्न असेल. पण या सगळ्या गोष्टीवर ईलाज करायचा असेल तर निवडणूक आयुक्तांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. कारण हे बसल्या जागी फुकटचा जनतेचा पैसा खाताहेत. आणि सत्ताधाऱ्यांची लाचारी करताहेत, असंच नाईलाजाने म्हणावं लागेल.