
निवडणूक आयुक्तांची नेमणूक मोदींनी केली आहे. ही लोकसभा निवडणूक घशात गेली तर महाराष्ट्रात निवडणुका होतील की नाही ते सांगता येत नाही. लोकसभा निवडणूक झाली की मोदीजी तिथे अध्यक्ष म्हणून बसतील आणि पुतीनप्रमाणे न्यायमूर्तीसुद्धा नेमतील, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दापोली येथील जनसंवाद सभेवेळी केला.
भाजपच्या फोडा आणि राज्य करा या नीतीवर टीकेचे आसूड ओढताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजप म्हणजे भाडोत्री जनता पक्ष झाला आहे. त्याचं सध्या शीर्षासन सुरू आहे. म्हणजे खाली डोकं वर पाय. आता भास्करराव तुम्ही म्हणालात की कुणीतरी तुम्हाला नाच्या म्हणालं. हे नाच्या बोलणारे, त्यांचाच दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ सुरू आहे. हे हुजरे आहेत, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. यांना फक्त मधाचं बोट चाटवलं किंवा कोपराला गूळ लावला की हे शांत बसणार. यांच्याकडे लक्षही देऊ नका. कारण आपली लढाई त्यांच्याशी नाहीच. भाडोत्री जनता पक्षाकडे माणसं शिल्लक नाही राहिली त्यामुळे आपलीच माणसं फोडून त्यांना गद्दारीचं दूध पाजून आपल्यावरती सोडताहेत. ते एवढे नीच आहेत की उद्या मारामारी आपल्यातच होईल. या भाडोत्री जनता पक्षाचे कपडे साफ राहतील, रक्त आपलं सांडलं जाईल. दुर्दैवाची गोष्ट अशी की हे त्यांना कळत नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीवरूनही उद्धव ठाकरे यांनी मोदींवर शरसंधान साधलं. ते म्हणाले, महापालिकेच्या निवडणुका अजून झालेल्या नाहीत. कश्मीरमध्ये चार ते पाच वर्षं झाली विधानसभा निवडणुका झालेल्या नाहीत. ही लोकसभा त्यांच्या घशात गेली तर महाराष्ट्रात निवडणूक होईल की नाही सांगता येत नाही. ही एकच निवडणूक झाली की हे मोदीजी तिकडे अध्यक्ष म्हणून बसतील, अध्यक्ष पद्धत सुरू करतील. आणि मग रशियामध्ये न्यायमूर्तीसुद्धा पुतीन नेमतात, तसे हे न्यायमूर्तीसुद्धा नेमायला लागतील. जसे हे निवडणूक आयुक्त ते नेमताहेत. ज्या प्रमाणे बंगालच्या न्यायमूर्ती गंगोपाध्याय यांनी राजीनामा दिला. आजपर्यंत अशी पद्धत होती की न्यायमूर्ती त्यांची कारकिर्द संपल्यानंतर पक्षात जायचे आणि राज्यसभेचे खासदार व्हायचे. हीही पद्धत चुकीची होती. पण गंगोपाध्यायांनी आणखी एक पाऊल पुढे टाकलं. ते राजीनामा देऊन भाजपमध्ये गेले, तृणमूलवरती दुगाण्या झाडल्या आणि तेवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी स्पष्ट सांगितलं की गेले काही दिवस भाजप आपल्या संपर्कात होता, मीही भाजपच्या संपर्कात होतो. जर संपूर्ण न्यायप्रक्रिया यांनी नासवली असेल, न्यायमूर्ती उघडपणे सांगताहेत की भाजप माझ्या संपर्कात होता. आमची सर्वोच्च न्यायालयात केस सुरू आहे, आम्ही संपर्क करू शकतो का? आमच्यासाठी दार उघडतील का कोणी? प्रत्येक गोष्टीची मर्यादा आहे, ती आम्ही सांभाळत आहोत. आम्हालाही सर्वोच्च न्यायालयाकडून उशीर होतोय, तरीही आम्ही विश्वास ठेवून आहोत की आज, उद्या नाहीतर परवा अपात्रतेचा निकाल लागेल आणि आम्हाला न्याय मिळेल ही आशा आणि प्रार्थना करतोय. मग कशावरून गंगोपाध्याय यांनी गेल्या काही वर्षांत तृणमूलच्या विरोधात दिलेले निकाल हे भाजपप्रणित नसतील असं आपण मानू शकतो? अशी ही भाजपप्रणित काळी मांजरं जर न्यायप्रक्रियेत नेमणार असाल आणि उद्या 400 पार झाल्यानंतर उघड उघड त्यांच्या नेमणुका करणार असाल तर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये फरक कोणता राहिला?, असा रोखठोक सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.


























































