शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला शहा आणि फडणवीस यांच्या आशीर्वादाची गरज नाही!

2145

मी शिवसेनाप्रमुखांना वचन दिले आहे की, मी एक ना एक दिवस महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवेन. ते वचन मी पूर्ण करणारच. त्यासाठी मला अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीची किंवा आशीर्वादाची गरज नाही, अजिबात नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे यांनी आज भाजपवर जबरदस्त घणाघात केला. सत्तास्थापनेसाठी सर्व पर्याय खुले आहेत, असा आवाज देतानाच फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यावरून पुन्हा पलटी मारणाऱया भाजपची उद्धव ठाकरे यांनी पिसेच काढली. देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांचा संदर्भ देऊन माझ्यावर खोटेपणाचा आरोप केला आहे; पण अमित शहा आणि कंपनी खोटारडी आहे, असा दणकाही उद्धव ठाकरे यांनी दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या आरोपांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथील पत्रकार परिषदेत जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पाहिली आणि काळजी वाटली. या पत्रकार परिषदेत ते जे बोलले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद यासाठी देतो की, त्यांनी पाच वर्षांत जी अचाट कामे केली त्याचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत आम्ही राहिलो नसतो तर ती जी अचाट कामे केली ती झाली असती का, या प्रश्नाचं उत्तर त्यांनी स्वतःला विचारलं तर बरं होईल. गेल्या पाच वर्षांत आम्ही कुठेही महाराष्ट्राच्या विकासकामांच्या आड राजकारण येऊ दिलं नाही.

…म्हणूनच जनतेचा शिवसेनेवर विश्वास
आम्ही विचार करूनच शब्द देतो, कारण तशी शिकवणच आम्हाला शिवसेनाप्रमुखांची आहे. एकदा शब्द दिला म्हणजे दिला, परत मागे घेत नाही. पाच वर्षांत जे काही जनतेच्या हिताचे प्रश्न मांडले ते मांडताना अनेकांना प्रश्न पडला, हे सत्तेत आणि विरोधातही आहेत? पण कोणत्याही टीकेची पर्वा न करता जनतेची बाजू मांडत आलो. सरकारमध्ये सामील असतानाही न्याय मिळवून देत आलो. म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेचा शिवसेनेवर जो विश्वास आहे तो या शब्दामुळेच आहे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

खरं कोण आणि खोटं कोण हे जनता पुरेपूर ओळखून आहे
मला एका गोष्टीचं दुःख झालं. शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीय, शिवसेनाप्रमुख आणि त्यांचा परिवार. या परिवारावर म्हणजेच माझ्यावर पहिल्यांदाच खोटारडेपणाचा आरोप करण्यात आला आहे. अर्थात कोणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राची जनता नक्की जाणते की, शिवसेनाप्रमुख काय होते आणि त्यांचा मुलगा काय आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांचा संदर्भ घेऊन माझ्यावर खोटेपणाचा आरोप केलाय. देवेंद्रजींना मी सांगू इच्छितो की, अमित शहा आणि कंपनीने आमच्यावर खोटेपणाचा कितीही आरोप केला तरी जनता पुरेपूर ओळखून आहे की, खरं कोण बोलतं आणि खोटं कोण बोलतं, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

शिवसेनाप्रमुखांना वचन दिलं, शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार आणि मी ते पाळणारच!
आमच्यात काय ठरलं होतं त्याला आपणही साक्षीदार आहात असे पत्रकारांना सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीवेळी मी दिल्लीला गेलो नव्हतो. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस माझ्याकडे आले होते. तत्पूर्वी युतीची चर्चा आमच्यात चालली होती. मधल्या काळात युतीची चर्चा चालली होती ती माझ्यामुळेच थांबली. मला सांगितलं होतं की, उपमुख्यमंत्रीपद तुम्हाला मिळेल. मी म्हटलं होतं की, उपमुख्यमंत्रीपदासाठी युती करण्याइतका मी लाचार नाही. मी शिवसेनाप्रमुखांना वचन दिलं आहे, मी एक ना एक दिवस महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवेन. ते मी पाळणार म्हणजे पाळणारच. त्याच्यासाठी मला अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीची किंवा आशीर्वादाची गरज नाही, अजिबात नाही अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले.

आता कळलं, शब्दांचा खेळ कसा केला जातो!
ठरलेलं मानलं नाही तेव्हा मी उठून निघून आलो. त्यानंतर दुसऱया दिवशी अमित शहांचा फोन आला. उद्धवजी, आप क्या चाहते है? त्यांनी विचारलं. त्यांना मी सांगितलं, मी माझ्या वडिलांना वचन दिलेलं आहे. ते म्हणाले, ठीक आहे. ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री बसेल. मी नाही म्हटलं. याच सूत्राने आपण गेली 25 वर्षे एकमेकाला खड्डय़ात घालत आलो. पाडापाडी करीत आलो. तुला नाही मला आणि डोक्यावर दुसराच कोणी तरी बसतो. मला समसमान जागावाटप हवं आणि मुख्यमंत्रीसुद्धा अडीच अडीच वर्षांचा हवा. तेव्हा त्यांनी सांगितलं, आपका मुख्यमंत्री रहेगा तो आप हमे कन्सिडर करो औsर जब हमारा रहेगा तो हम आपको कन्सिडर करेंगे. म्हटलं ठीक आहे. चांगूलपणाने एकदा सरकार स्थापन केलं की सुसंवाद असायलाच हवा. त्यानंतर ते ‘मातोश्री’वर आले, शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत बसले आणि म्हणाले, मी ठरवलंय, माझ्या काळात जे संबंध बिघडले, आता तेच संबंध सुधारायचे आहेत. मी म्हटलं, ठीक आहे. हे जे आपलं ठरलंय ते सर्वांना सांगा. मग देवेंद्रजींना ते सांगण्यात आलं. मग देवेंद्रजी मला म्हणाले, आता जर का मी मुख्यमंत्रीपदाचं वाटप झालं असं बोललो तर मला पक्षात अडचण होईल. नंतर ते मी माझ्याच शब्दांत मांडतो. ते शब्दांचा खेळ कसा करतात ते आता मला कळले आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना टोला हाणला.

 जे जमत नसेल ते बोलायला मी भाजपवाला नाही!
मी चर्चा जरूर थांबवली. जे काही ठरलं ते ठरलं नव्हतं असं म्हणत असतील तर ते मी सहन करणार नाही. ठरलं होतं आणि देऊ शकत नाही असं म्हणत असाल तर ठीक आहे. ते मानायचं की नाही हा माझा अधिकार आहे. पण ठरलं नव्हतंच असं जर सांगत असाल तर शिवसैनिकांसमोर खोटा म्हणून जाऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या जनतेसमोर शिवसेनाप्रमुखांचा मुलगा खोटं बोलतोय ही माझी ओळख कदापि होऊ देणार नाही. जे जमतंय ते मी करेन. तेच बोलेन. जे जमत नसेल ते बोलणार नाही. खोटं मी बोलणार नाही, कारण मी भाजपवाला नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी या वेळी केला.

खोटे बोलण्याची परंपरा शिवसेनेची नाही
अनौपचारिक चर्चेत जे मुख्यमंत्री बोलले ते मला दुःख देणारं होतं. पहिली अडीच वर्षं आमची, दुसरी अडीच वर्षं तुमची हे मी मानलं असतं. खातेवाटपात मी मानलं असतं. पण 2014 साली जेव्हा शिवसेना सोबत होती, आमच्या गळय़ात हेवी इंडस्ट्रीचं खातं मारण्यात आलं. 2019 साली चांगलं काम करता येईल असं खातं द्या सांगितलं तेव्हाही तेच खातं आमच्या माथी मारलं. नितीशकुमारने वेगळी चूल मांडली, मी नाही मांडली. पण या वेळेला काही तरी करू म्हणून सांगितलं; पण मला माहीत नाही कधी करतील. खोटे बोलण्याचा जर हिशेब काढला तर असा सवाल करतानाच उद्धव ठाकरे यांनी, भाजपला मी अजूनही शत्रू मानत नाही. शिवसेनेची परंपरा ही खोटं बोलण्याची नाही, असूच शकत नाही. गेल्या पाच वर्षांत सत्ता मिळविण्यासाठी अच्छे दिन आणण्यापासून खोटं कोण कोण बोललं आहे? नोटबंदीच्या वेळी पचास दिन मुझे दे दो पासून खोटं कोण कोण बोललंय हे सर्व जनता बघतेय, असा इशाराच दिला.

पाहा भाषणाचा व्हिडीओ-

भावाभावाच्या नात्यात काडय़ा घालण्याचे उद्योग करताहेत
हे बघत आल्यानंतर लोकसभा जिंकल्यानंतर राज्यात वाताहत झाली आहे. लोकसभेचा निकाल बघितल्यानंतर 220 ते 230 जागा जिंकू शकतो अशी अपेक्षा होती. त्यानंतर जो आकडा घसरला त्यात स्ट्राइक रेट कसला, असा सणसणीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ते पुढे म्हणाले, 144 जागा ठरल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, उद्धवजी आमची अडचण समजून घ्या. ही अडचण मी समजून घेतली हा माझा गुन्हा झाला का? मी 124 जागा स्वीकारल्या. त्यासुद्धा तुम्ही द्याल त्या स्वीकारल्या. तुमच्याकडे तुम्ही सर्व काही फोडाफोडी करून जिंकलेल्या जागा तुमच्याकडे घेतल्या. त्याही मी स्वीकारल्या. साताऱयाची शिवसेनेची जागा माझ्याशी चर्चा न करता उदयनराजेंना दिली, तेही मी सहन केलं. आणि मोदीजींवर टीका मी सहन करणार नाही असं म्हणताहेत. मी कुठे मोदीजींवर टीका केली आहे? पण साताऱयात उदयनराजे यांना घेतल्यानंतर जी पगडी त्यांनी मोदीजींच्या डोक्यावर ठेवली ती पगडी डोक्यावर ठेवताना उदयनराजे मोदीजींना काय बोलले होते? आणि जिंकल्यानंतर त्यांनी पेढे कोणत्या पेढेवाल्याकडून आणले? हे तुम्हाला चालतं का, असा सवाल करताना उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही मोदीजींवर टीका केलेली नाही; कारण मोदीजी मला दोन वेळा लहान भाऊ म्हणाले आहेत. हे भावाभावाचं नातं कुणाच्या पोटात दुखत असेल, त्यानिमित्त कोणी त्यामध्ये काडय़ा घालण्याचं उद्योग करीत असेल तर तो शोध मोदीजींनी घ्यायला हवा.

चुकीच्या माणसांसोबत कारण नसताना गेलो
महत्त्वाचा मुद्दा असा आहे. उलट मला एका गोष्टीचं बरं वाटत होतं. हिंदुत्व मानणाऱया दोन शक्ती लोकसभेच्या निमित्त एकत्र आल्या होत्या. आनंद वाटत होता. झालं गेलं ते जरी स्वच्छ केलं नसलं तरी ते गंगेला मिळालं. पण गंगा साफ करता करता यांची मनं कलुषित झाली याचं मला दुःख होत आहे. या मनांमध्ये सत्तेची लालूच एवढय़ा थराला जाईल हे मला वाटलं नव्हतं. मला वाईट वाटतंय की, चुकीच्या माणसांसोबत आपण कारण नसताना गेलो, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

खोटं बोलणं कोणत्या हिंदुत्वात बसतं याचा विचार आरएसएसने करावा
आरएसएसबद्दल मला आदर आहे. ती एक हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपचा पाठकणा आहे. गेल्या वेळी जेव्हा ‘आरएसएस’कडूनही निरोप आले होते. अगदी अरुण जेटलीजींनीही मला सांगितलं होतं, म्हणून ती युती झाली होती. पण आरएसएसनेही विचार करायला हवा की, खोटं बोलणं कोणत्या हिंदुत्वात बसतं, असा परखड सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

…तर कोणत्या हातांनी रामाची पूजा करणार?
राममंदिर कशासाठी आपण बांधत आहोत, असा सवाल करतानाच उद्धव ठाकरे म्हणाले, राममंदिराचं श्रेय घेत असू तर राम जसा एकवचनी होता, जसा सत्यवचनी होता. तो जर का प्रभू रामचंद्राचा गुण आपण आत्मसात करणार नसू तर कोणत्या हाताने आपण रामाची आरती आणि पूजा करणार आहोत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

कोणाचेही आमदार न फोडता तुमचं सरकार कसं येणार?
ते म्हणताहेत की, उद्धवजींनी पहिल्याच पत्रकार परिषदेत सर्व पर्याय आम्हाला खुले आहेत हे सांगितलं. त्याच्यामुळे तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल तर मला कल्पना नाही तो किती बसला. पण मला आज आश्चर्याचा धक्का बसला आहे की, बहुमत नसताना सरकार आमचंच येणार असं जेव्हा काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणतात तेव्हा ते सरकार कसं येणार? शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र येऊन येणार का? हा जो काही त्यांना धोका वाटतो तर आमच्यापैकी कोणाचीही मदत न घेता, कोणाचेही आमदार न फोडता तुमचं सरकार कसं येणार? हा पर्याय तुम्हाला जर खुला असेल तर मी माझ्या पर्यायाचा विचार केला तर तुम्ही मला गुन्हेगार ठरवणारे कोण, असा परखड सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

मला खोटं ठरवणाऱ्या माणसाशी मी बोलणार नाही
महत्त्वाचा मुद्दा असा की, त्यांच्याशी बोलायला मला वेळ नाही. वेळ होता, पण मी बोललेलो नाही. कारण मला खोटं ठरवणाऱया माणसाशी मी बोलणार नाही. हे मी गर्वाने नव्हे, तर माझ्या घराण्याची परंपरा म्हणून सांगतो. होय, मी तुमच्याशी बोललो नाही आणि जोपर्यंत तुम्ही खोटं बोलताय हे सांगत नाही तोपर्यंत मी बोलणार नाही. कारण असे खोटे संबंध मला ठेवायचे नाहीत असे स्पष्ट करतानाच उद्धव ठाकरे म्हणाले, ते म्हणतात, आमच्याशी बोलायला वेळ नाही आणि काँग्रेस-राष्ट्रवादीशी तीन तीन वेळा बोलत होते. तुम्ही आमच्यावर पाळत ठेवताय? कशाला पाळत ठेवताय, आम्ही चोरून मारून काही गोष्टी करीत नाही, आम्ही जे करतो ते उघड उघड करतो. आम्हाला जे पटेल तेच आम्ही करतो. तुम्ही आमच्यावर पाळत ठेवून काहीही उपयोग होणार नाही.

झालेल्या चुका सुधारा आणि पुन्हा चुका करू नका!
ही परिस्थिती भाजपने निर्माण करून ठेवली आहे. मी सांगतो की, भाजपने लवकरात लवकरच सत्तास्थापनेचा दावा करावा. नाहीतर सर्वांना सर्व पर्याय खुले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही वाऱयावर सोडू शकत नाही. महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असताना तुम्ही जो नवा वाद निर्माण करत आहात, खोटं कोण तुम्ही का आम्ही? पण मी पुन्हा एकदा सांगतो, आम्हाला तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही; कारण जेवढा विश्वास महाराष्ट्रातील माताभगिनी आणि बांधवांचा शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनाप्रमुखांच्या परिवारावर आहे तेवढाच अविश्वास अमित शहा आणि कंपनीवर आहे हे देवेंद्रजींनी लक्षात ठेवावं आणि कृपा करून झालेल्या चुका सुधारा आणि चुका पुढे करू नका एवढीच माझी त्यांना काळजीयुक्त विनंती आहे, असा विनंतीवजा सल्लाच उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न काळजीवाहूंनी करू नये!
शिवसेनेने चर्चेचे दरवाजे बंद केले आहेत का असा सवाल पत्रकारांनी केला असता, उद्धव ठाकरे म्हणाले, मी पुन्हा एकदा सांगतो चर्चेचे दरवाजे बंद केले नाहीत. बंद केले ते तेव्हा, जेव्हा त्यांनी माझ्यावर खोटेपणाचा आरोप केला मी खोटेपणाचा आरोप  सहन करू शकत नाही. आयुष्यात खोटं कधी बोललो नाही. शिवसेनाप्रमुखांचा पुत्र खोटं बोलणार नाही हा विश्वास महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आहे. मला खोटं ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न काळजीवाहूंनी करू नये, असा खोचक सल्लाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

अजूनही काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा केलेली नाही!
काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार स्थापन करणार का, या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, मी अजूनही काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा केलेली नाही. मुख्यमंत्र्यांची जर तशी इच्छा असेल तर अहमद पटेलांशी संबंध गडकरींचे आहेत, माझे नाहीत. प्रफुल्ल पटेल- अमितभाईंचे आहेत, माझे नाहीत. माझी आहे, पण चर्चा त्यांची चालू आहे. नितीन गडकरी भाजपचे दूत म्हणून चालतील का, या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, मला दूतांची गरज नाही. दूध का दूध पानी का पानी करा एवढंच माझं म्हणणं आहे. विरोधकांनी जेवढे घाव केले नाहीत तेवढे मित्रपक्ष शिवसेनेने केले असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता उद्धव ठाकरे म्हणाले, एवढे घाव करूनही तुम्ही माझ्या जवळ का येत होतात?

त्यांना पगडय़ा आणि आम्हाला टोप्या घालताहेत
जे ठरलंय त्यासंदर्भात अमितभाईंचा फोन आला होता का, यावर उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभेवेळी ते मला भेटायला आले होते. त्यावेळी त्यांनी प्रेमाने बोलावल्याने मी नरेंद्र मोदी आणि अमितभाईंचा अर्ज भरायलाही गेलो होतो. त्यानंतर एनडीएच्या बैठकीलाही मी गेलो होतो. खरंच, मी त्यावेळी आनंदी होतो. झालं गेलं जाऊ द्यात. जर चांगलं वातावरण निर्माण होत असेल तर तुम्ही हक्काने बोलावत आहात त्यानुसार मी गेलो होतो. पण तेव्हा जसे दिवसातून चार-चार वेळा फोन येत होते. पण आता मला आश्चर्य वाटतंय. जो दुष्यंत चौटाला वेडंवाकडं बोलतो त्यांच्यासोबत त्यांनी युती केली. उदयनराजे जे काही बोलले त्यांच्या हातून पगडी घालून घेतली आणि टोप्या आम्हाला घालताहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.

हिंदुत्वाच्या धाग्यात खोटेपणाला स्थान नाही. हिंदुत्व म्हणजे खरेपणा. जर त्यात खोटेपणा येत असेल तर त्याला हिंदुत्व म्हणताच येणार नाही. मी जे काही बोललो ते मोदीजींना व्यक्तिगत बोललेलो नाही. जे काही बोललो ते धोरणांबद्दल बोललो. लोकसभेनंतर त्यांनी दाखवावं की, कधी मी मोदींविरोधात बोललो. 370 कलम काढल्यानंतर पहिल्यांदा मिठाई वाटणारा पहिल्यांदा मी होतो आणि मला त्याचा अभिमान आहे.

 मला यांच्या खऱया-खोटेपणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही
पद आणि जबाबदारी याचं समसमान वाटप. पद म्हटल्यानंतर मुख्यमंत्री हे पद आहे की नाही? मुख्यमंत्री पद ही जबाबदारी आहे की नाही? त्याचं समसमान वाटप हे नक्कीच ठरलेलं होतं. मला यांच्या खरेखोटेपणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही असे सांगतानाच उद्धव ठाकरे म्हणाले, दुर्दैवाने आता यांचं जे घोडं अडलंय… मला शिवसैनिकांचा अभिमान वाटतो. 2014 साली आम्ही एकाकी लढून निवडणुका लढवल्या तेव्हाही यांचं घोडं अडवलं होतं. आणि आता हे आम्हाला मिठी मारून गोड बोलून संपवण्याचा प्रयत्न करीत होते. त्या गोड बोलण्यातही आम्ही यांचं घोडं अडवलेलं आहे. पण सत्तेची खुर्ची माणसाला किती वेडं करते हे यातून दिसून आले. देवेंद्र फडणवीस हे माझे चांगले मित्र होते, अजूनही आहेत. ते मुख्यमंत्री होते म्हणून आणि म्हणूनच मी त्यांना पाठिंबा दिला होता. त्यांच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण होईल, कधी होईल यापेक्षा महाराष्ट्राने ठरवायचं की, खरी बोलणारी लोकं हवीत की खोटी बोलणारी लोकं हवीत? आम्ही कधी खोटं बोलून काम केलेलं नाही आणि खोटं बोलणं आमच्या रक्तात नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेसमोर खोटं आणि खरं असा पेच टाकून आपल्या सत्तेची लालसा पूर्ण करण्याचा प्रयत्न काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी करू नये.

महाराष्ट्राच्या जनतेला उल्लू बनवण्याचं काम थांबवावं
यावेळी मोदींवर कोणी कोणी टीका केली याची जंत्रीच उद्धव ठाकरे यांनी मांडली. दुष्यंत चौटाला यांच्या वक्तव्याची क्लिपच त्यांनी दाखवली.  ते म्हणाले, चौटाला ते नुसतं मोदीजींवर बोलले नाहीत, तर माझ्या गुजराथी माता-भगिनींबद्दल बोललेले आहेत. दुष्यंत चौटाला सरळ म्हणाले आहेत, ‘दो गुजराथी हमे सिखायेंगे राष्ट्रवाद? इनके यहां लोक फौज मे जाने से डरते है’; पण असे वार तर मी मोदींजीवर केलेले नाहीत किंवा अमित भाई यांच्यावरही केलेले नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजपच्या खोटेपणाचा पुरावाच त्यांनी दिला. कुलदीपसिंह बिष्णोई यांना कसं गंडवण्यात आलं? 2014 साली भाजपच्या सर्व नेत्यांनी अगला मुख्यमंत्री कुलदीपसिंह बिष्णोईही होगा असं ठासून सांगितलेलं आहे. नंतर त्यांनी शब्द फिरवला. त्यामुळे शब्द देऊन फिरवण्याची आमची वृत्ती नाही. महाराष्ट्राच्या जनतेला उल्लू बनवण्याचं काम त्यांनी थांबवायला हवं. त्यांनी सरळ सांगावं की या गोष्टी ठरल्या होत्या, त्या आम्ही आता देत नाही, असे आव्हानच उद्धव ठाकरे यांनी भाजपला यावेळी दिले.

जे सरकार तुम्ही इतरत्र आणलंत. गोव्यात आणलंत, कर्नाटकात आणलंत, मणिपूरमध्ये आणलंत. हे सर्व चाळे आम्ही तुमच्याकडूनच शिकलो. तुमच्याकडून या गोष्टी शिकलो, पण खोटं बोलणं नाही शिकलो. कारण ते माझ्या परंपरेत नाही आणि ते मला शोभून दिसणार नाही.

राम मंदिराचं श्रेय सरकार घेऊ शकत नाही
राम मंदिराचा निकाल लवकरच लागणार आहे. हा निकाल कोर्टाकडून लागणार आहे. सरकारचा यामध्ये काडीचाही संबंध नाही. जे काय आहे ते कोर्ट करणार आहे. सरकार याचं श्रेय घेऊ शकत नाही. कारण शिवसेना आणि आरएसएसही सांगत होती की कायदा करा, वटहुकूम काढा आणि राममंदिर बनवा. पण ते काही सरकारला जमलं नाही. सरकार ते करायला धजावलं नाही, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

नाणार परत आणायचं म्हणताय, उद्या 370 कलमही परत लावाल!
भाजपचं सरकार येणार, अद्याप युती तुटली नाही! या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले, हे त्यांच्यावर आहे, मी बोललो त्यावर आजही ठाम आहे. मी काय म्हणून युती केली? जो काय नाणारचा विषय होता. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, नाणार आम्ही परत आणणार. अरे तुम्हीच किती खोटं बोलताय? उद्या असंही बोलतील की, आम्ही 370 कलम रद्द केलं, आता परत लावू. तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? जर घालवलेला नाणार प्रकल्प मुख्यमंत्री म्हणत असतील कुणाची मागणी असेल तर परत आणू तर उद्या ते असेही म्हणतील, 370 कलमाची मागणी आहे, आम्ही ते परत लावतो. तुमच्या शब्दावर कुणाचा विश्वास नाही. युती ठेवायची असेल तर जसं शपथ घेताना, ईश्वर साक्ष मी खरं बोलेन…खोटं बोलणार नाही अशी शपथ त्यांनी घ्यावी, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

‘वर्षा’वर काय घडले…
शुक्रवारी सकाळी ठरल्याप्रमाणे भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झाली. या बैठकीत पुढील राजकीय सत्ता समीकरणे कशी असतील याबाबत चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे भाजप आमदार ऍड. आशीष शेलार, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे  निवेदन याबाबतचा सविस्तर मसुदा तयार केला.
आशीष शेलार व मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी डॉ. संजय कुटे यांनी दुपारी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेऊन त्यांना मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत पूर्व- कल्पना देत संभाव्य परिस्थितीबाबत चर्चा केली.
त्याच वेळी भाजप नेते गिरीश महाजन व अन्य मंडळी पुढील सत्ता समीकरणे कशी असतील याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करत होते.

गडकरी कॅम्पमध्ये खलबते
राज्यातील सत्ता समीकरणांपासून गेल्या पंधरा दिवसांपासून चार हात लांब असलेले भाजप नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शुक्रवारी सकाळी मुंबईत दाखल झाले. ते मुंबईत येताच विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांनी ज्यांना उमेदवारी नाकारली असे भाजप नेते विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वप्रथम वरळी येथील ‘सुखदा’ निवास्थानी धाव घेतली आणि त्यांना एकंदर परिस्थितीची माहिती दिली. त्यांच्यापाठोपाठ सुभाष देशमुख, संभाजी पाटील-निलंगेकर हेदेखील गडकरी कॅम्पमध्ये दाखल झाले. गडकरी दिल्लीतून काहीतरी निरोप घेऊन आले असतील आणि ते सत्ता स्थापनेचा तिढा सोडवतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती; पण त्यांनीदेखील अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचे ठरलेच नव्हते, ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री हीच टेप वाजवली.

रंगशारदा ते रिट्रीट…
शिवसेनेचे आमदार गुरुवारी ‘मातोश्री’वरील बैठकीनंतर वांद्रे येथील रंगशारदा येथे मुक्कामी होते. ते आज तिथून मालाड येथील ‘रिट्रीट’ हॉटेलमध्ये रवाना झाले. रंगशारदा येथे हे आमदार असताना कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रिट्रीट येथेही या आमदारांना कडक पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. तसे पत्र शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या