मुंबईतील मांटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा जाहीर मेळावा झाला. या मेळाव्यातमहाविकास आघाडीची एकजुट आणि वज्रमुठ पहायला मिळाली. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचा हात, शिवसेनेची मशाल आणि राष्ट्रवादीची तुतारी वाजवणारा मावळा ही निशाणी घराघरामध्ये पोहोचवा आणि हातामध्ये मशाल घेऊन महायुतीच्या बुडाला आग लावून विजयाची तुतारी फुंका, असे म्हणत आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे म्हणाले की, कालच स्वातंत्र्यदिवस साजरा केला आणि आजपासून आपण पुढच्या लढाईला सुरुवात करतोय. निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेत आहे. आजच त्यांनी महाराष्ट्राची निवडणूकही जाहीर करून टाकावी. आमची तयारी आहे, पण वाटते तेवढे ही लढाई सोपी नाही. लोकसभेत राजकीय शत्रुला आपण पाणी पाजले. लोकसभेची निवडणूक ही संविधानाच्या, लोकशाहीच्या रक्षणाची लढाई होती. आताची लढाई ही महाराष्ट्र धर्म रक्षणाची, महाराष्ट्राची अस्मिता, संस्कृती आणि स्वाभिमान जपण्याची लढाई आहे.
लढायची जिद्द अशी पाहिजे की एक तर तू राहशील नाही तर मी राहीन. या जिद्दीने लढाई लढली पाहिजे. पण हे आपल्या मित्र पक्षात नको. आपण सर्वांनी महाराष्ट्र लुटायला आलेल्यांना सांगायचे की एक तर तू राहशील नाही तर मी राहीन, असा भीमटोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. ते पुढे म्हणाले की, सरकारला आता जाग आली असून डुबक्या मारून पवित्र होता येईल का हे बघताहेत. यासाठी सगळीकडे स्वत:चे फोटो छापताहेत. पुढची लढाई तुम्हाला, आम्हाला लढायची आहे. त्याआधी माझ्यापेक्षा महाराष्ट्राचे हित आम्ही जपू, मला उमेदवारी मिळाली नाही तरी चालेल पण महाराष्ट्र लुटणाऱ्यांना खाली खेचू अशी शपथ घेतली पाहिजे.
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? असे विचारून महायुतीत बसलेले लोक काड्या करत आहेत. पण सर्वांसमोर सांगतो तुमच्यापैकी कोणालाही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा उद्धव ठाकरे यांचा त्याला पाठींबा असेल. कारण मी माझ्यासाठी लढतोय ही भावना माझ्यात नाही. मी माझ्या स्वार्थासाठी नाही तर महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी लढतोय. महाराष्ट्राला झुकवण्याची आजपर्यंत कुणाची हिंमत झाली नाही आणि यापुढेही होणार नाही. महाराष्ट्राला झुकवण्याची जो हिंमत करतो त्याला आम्ही गाढून टाकतो या इतिहासाची पुनरावृत्ती करायची आहे, असा खणखणीत इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
वाचा उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील आणखी ठळक मुद्दे –
– मुख्यमंत्री कोण होणार हे आम्ही बघू. पण भाजपसोबतच्या युतीत घेतलेल्या अनुभवाची पुनरावृत्ती नको. भाजप-सेना युतीवेळी बैठकांमध्ये ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री हे धोरण असायचे आणि आम्ही एकमेकांच्या पायवर धोंडे टाकायचो. कारण तुझ्या जागा जास्त आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल म्हणून जागा पाडायचे. पाडापाडीच्या राजकारणात युतीला काय महत्त्व राहिले? त्यामुळे आधी ठरवा आणि मग पुढे चला.
– महाविकास आघाडीची मुंबईत प्रथम बैठक होत असून आपण यजमानपद स्वीकारूया आणि ओपनिंग बॅट्समनची भूमिका बजावूया असा विचार कला. ओपनिंग बॅटसमनचे कसे असते चांगला स्कोर केला तर केला, नाहीतर विकेट फेकायची आणि मॅच एन्जॉय करायची. बाकीचे प्लेअर खेळणार आहेतच, त्यांची बॅटिंग बघू.
– सरकारी योजना घरोघरी पोहोचवण्यासाटी 50 हजार दूत नेमणार आहेत. हे त्यांचेच चेलेचपाटे असणार आहे. त्यांना 10 हजार प्रति महिना दिला जाणार. म्हणजे लाडक्या बहिणीला 1500 आणि यांच्या योजना पोहोचवणाऱ्याला 10 हजार रुपये. त्यातही या दुतांची खोटी नावे देऊन पैसा ओरबडला जाईल.
– महापालिका निवडणुकाही घेत नाहीत, विधानसभाही एखाद महिना पुढे ढकलतील. कशासाठी तर कोरोनामध्ये आपण केलेली कामं लोकांना विसरायला लावण्यासाठी. ते विसरायला लावायचे आणि स्वत:च्या न केलेल्या योजनांच्या थापा मारायच्या.
– लाडकी बहीण योजनेसाठी पैसे कुठून आणायचे म्हणून न्यायालयानेही फटकारले आणि ही योजना थांबवू असे म्हटले. सरकार पाडायला 50 खोके आणि लाडक्या बहिणीला 1500 रुपये. मोदींनीही 15 लाख रुपये खात्यात येईल म्हटले होते. त्या 15 लाखांचे 1500 रुपये का झाले?
– शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससबाबतचा निर्णय येत्या 50-60 वर्षात नक्कीच मिळाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही लवकरची तारीख द्या म्हटले तर तुम्ही आम्हाला आदेश द्यायचा नाही म्हणायचे. आम्ही हात जोडून उभे आहोत. या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी आम्हाला नक्की न्यायदेवता पावल्याशिवाय राहणार नाही.
– बांगलादेशमुळे स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित झाले असे सरन्यायाधीश म्हणतात. पण तिथे जी हुकुमशाही, दडपशाही सुरू होती तिच्याविरोधात जनता रस्त्यावर उतरली. पंतप्रधान, सरन्यायाधीशांना राजीनामा द्यावा लागला. ही लोकशाही तुम्हाला मान्य आहे का? परवडणार आहे का?
– स्वातंत्र्याचे महत्त्व जाणून घ्यायचे असेल तर भुतकाळात डोकवावे लागेल. भुतकाळात डोकावतो तेव्हा आम्हाला रामशास्त्री प्रभुणे दिसतात. राघोबादादाला हे जे पाप आहे, गुन्हा आहे त्याला देहांत प्रायश्चित्ताशिवाय शिक्षा नाही असे सांगणारे रामशास्त्री प्रभुणे आमच्या भुतकाळात लपलेले आहेत. देशाचे स्वातंत्र्य त्याचे महत्त्व कळण्यासाठी भुतकाळात डोकवावे लागले तर आम्ही राजकारणी म्हणून काय करत आहोत आणि तुम्ही सरन्यायाधीश म्हणून काय केले हे देखील नमूद झालेले असेल.
– आपण लोकशाहीची लढाई लढतोय. पण ते हिंदू-मुसलमान आणि महाराष्ट्रात समाजामध्ये आगी लावत आहेत. कोरोना काळात आपण केलेले काम आज आपणच ज्यांना मोठे केले, जे महायुतीत बसले ते विसरले पण आपण ज्यांना वाचवले ते मुसलमान, बौद्ध, हिंदू आणि सगळेच विसरू शकले नाहीत. म्हणून मुसलमानसह सगळे आमच्यासोबत आले.
– मोदी काल सेक्युलर नागरी संहितेबाबत बोलले. म्हणजे तुम्ही हिंदुत्व सोडले का? हिंदुत्व न माणणाऱ्या चंद्राबाबू, नितीशकुमार यांच्या मांडीला मांडी लावून बसलात, मग तुम्ही हिंदुत्व सोडले का?
– वक्फ बोर्ड असो, हिंदू संस्थान, मंदिर किंवा कोणत्याही धर्माच्या जागा असतील तर आम्ही काही वेडेवाकडे होऊ देणार नाही. हा विषय फक्त वक्फ बोर्डाचा नाही. शंकराचार्य बोलतात केदारनाथमधील 200-250 किलो सोने गायब झाले. सोने चोरून पितळेचा मुलामा दिला. याचेही पितळ उघडे झाले पाहिजे. याच्या चौकशीसाठी जेपीसी लावा.
– आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. बिहारने वाढवलेली मर्यादा कोर्टाने उडवून लावली. हा अधिकार लोकसभेचा आहे. राष्ट्रपतीही सर्वोच्च न्यायालयाचा अहवाल, सल्ला घेऊन आरक्षणाची मर्यादा वाढवू शकतात. आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचे बील आला आम्ही महाविकास आघाडी म्हणून पाठींबा देऊ.
– एखादी जागा शिवसेनेकडून काँग्रेसकडे, काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडे किंवा राष्ट्रवादीकडून शिवसेनेकडे आली तर जागांसाठी मारामारी करू नका. सगळ्यांनी एकत्र काम केले पाहिजे. एकजूट, वज्रमुठ शब्दात नाही तर कामातून दिसली पाहिजे.
– तोतया आणि चोरांच्या हातात मी शिवसेना ठेवणार नाही. त्यांनी माझे धनुष्यबाण घेतले असेल तर त्यांच्या बुडाला आग लावण्यासाठी मी हातात मशाल घेतली आहे.