
जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समितीच्या वतीने मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित केलेल्या निर्धार परिषदेला उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. ज्या भाजपचं देशाच्या स्वातंत्र्यात काडीचं योगदान नाही, ते इथली व्यवस्था बिघडवून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन तसेच समितीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
हा कायदा किती वाईट आहे किंवा या कायद्याचा दुरुपयोग हा सर्वसामान्यांवरती कसा केला जाणार आहे किंवा केला जाऊ शकतो हे जोपर्यंत आपण सर्वसामान्यांना आपण पटवून देऊ शकत नाही तोपर्यंत याच्या विरुद्ध जनसामान्यातून उठाव होणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. सत्ताधारी काय म्हणतील, तुम्ही विरोधक आहात तुम्ही विरोधी बोलणारच. आहोत, विरोधी आहोत. पण आम्ही विरोधी तुमच्या सडलेल्या मानसिकतेविरोधी आहोत देशाच्या किंवा राज्याच्या विरोधात नाही, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.
“आपल्या संविधानात असं डावं आणि उजवं नाहीच. त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्ष आहे”
आम्हीही भाजपसोबत 25-30 वर्षे घालवलीच ना फुकट. तेव्हा आमच्यासमोर तुम्ही होता आणि बाजूला पवारसाहेब होते. पवारसाहेब आणि बाळासाहेब यांचं नातं तुम्हाला माहितीये. मतभेदपण टोकाचे आणि मैत्री तर त्याच्या पलीकडची. थोडक्यात राजकारणामध्ये मतभेद आहेत. मतभेद म्हणण्यापेक्षा मतभिन्नता आहे. मतभिन्नता असू शकते. आणखी कोणीतरी म्हणेल की उद्धव ठाकरे डाव्यांच्या व्यासपीठावरती आणि आले. कारण डावे म्हणजे कम्युनिस्ट आणि शिवसेनेत फार भयानक संघर्ष झालेला आहे. कालांतराने कळतंय की आपण ज्या कारणासाठी लढतो आहोत ते बाजूलाच राहतंय आणि आपण उगाचच आपल्यामध्ये भांडतोय. आणि राजकारणामध्ये व्यक्तीगत द्वेष, सूड हा असता कामा नये. आणि म्हणूनच पवारसाहेब, मी आणि काँग्रेस आणि कम्युनिस्ट का एकत्र येऊ शकलो? कारण आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये देशप्रेम हा एक कॉमन धागा आहे. आणि जो देशद्रोही असेल तो कोणीही असेल त्याला फासावरती लटकवलाच पाहिजे, याच्यामध्ये दुमत असू शकत नाही. पण हा जो काय कायदा आहे, या संपूर्ण कायद्यात मी सुद्धा त्याची पानं वाचली. याच्यात देशद्रोहाचा उल्लेखच नाही. सुरवातीच्या पॅरेग्राफमध्ये दोन वेळा कडव्या-डाव्या असा उल्लेख आहे. कडवे डावे म्हणजे काय? कडवे वाल माहितीहेत. बरं कडवं डावं आणि उजवं नेमकं आहे तरी काय हे प्रकरण? म्हणून मी समजून घेतलं की डावं काय आणि उजवं काय? तर आपल्या संविधानात असं डावं आणि उजवं नाहीच. त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्ष आहे, सगळ्यांशी समान वागणूक आहे. पण कडवं डावं हे असता कामा नये किंवा कडवं उजवं हे असलंच पाहिजे, असं काहीच लिहिलेलं नाहीये. माणसाला माणसासारखं राहू दिलं जाणं याला कुठल्या बाजूचं म्हणायचं ते तुम्ही म्हणा, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला.
“तुमचा जन्मसुद्धा नेहरूंच्या काळात झालेला आहे, आता त्यात नेहरूंचा काय दोष?”
आता हे सगळ्यांना कळलेलं आहे की, यांचा स्वातंत्र्य लढ्यात काही सहभाग नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही यांचा सहभाग नव्हता. हे आता आयत्या बिळावरती नागोबासारखे बसले आहेत. आणि लोकांकडून दूध पाजायची आपेक्षा करताहेत. यांचा कशाशी काही संबंध नव्हता, यांनी कधी आदर्श कोणते उभे केले नाहीत. ना काही विचार देशात देऊ शकले. मग काय करायचं? तर दुसऱ्याचे आदर्श चोरायचे. मग जरा काही कुठे झालं, हे असं कसं… हे नेहरूंच्या काळात झालेलं आहे. अमूक-अमूक झालं… हे नेहरूंच्या काळात झालेलं आहे. आहो तुमचा जन्मसुद्धा नेहरूंच्या काळात झालेला आहे. आता त्यात नेहरूंचा काय दोष? आता नेहरूंना दोष देताय. आता 11 वर्षे पूर्ण झाली, तुम्ही काय करता आहात? तुम्ही काही करू शकलात का? मग नेहरूंच्या ऐवजी वल्लभभाई जर का पंतप्रधान झाले असते तर आज हा संघ वैगरे दिसलाच नसता. कारण त्यावेळेला सरदार पटेलांनी संघावरती बंदी घातली होती. ती बंदीच उठली नसती. मग आता बोला नेहरू हवे होते का सरदार पाहिजे होते? मग त्यांचा मोठा पुतळा उभा करा. मध्येच सुभाषबाबूंचा पुतळा उभा करत होते. सुभाषबाबूंच्या मुलीने सांगितलं की, तुम्ही उजव्या विचारसरणीचे आणि सुभाषबाबू डाव्या विचारसरणीचे तुम्ही कसा काय पुतळा उभा करताय? असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लगावला.
“मंत्र्याच्या घरी रोकडची बॅग दिसली त्याला का नाही अटक होत?”
हे जे टेबल-टेनिस चाललंय तुम्ही स्वच्छ म्हणा की दहशतवाद किंवा देशद्रोही विरोधी कायदा, आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. जात, पात, धर्म बघू नका. जो कोणी देशाच्या विरोधात कारवाया करेल त्याचा देशद्रोही हा धर्म, लटकवा त्याला फासावरती आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. पण त्याच्याबद्दल काहीच स्पष्टता नाहीये. आणि एकूण जर का बघितलं की कायदा कशा पद्धतीने हे वापरू शकतात. आज पेपरमध्ये बातमी आहे, वसई-विरारच्या माजी आयुक्तांना अटक झाली. का तर त्यांच्याकडे रोकड सापडली. मग मंत्र्याच्या घरी रोकडची बॅग दिसली त्याला का नाही अटक होत? त्याला समज देऊन सोडून देतात, अरे अशी बॅग उघडी टाकू नको. पुढच्या वेळेला बंद ठेव. मला कोणतरी विचारलं की यांच्या घरातला व्हिडिओ कसा आला असेल? आतापर्यंत मी ऐकलं होतं भिंतीला कान असतात, आता भिंतीला डोळे आले. आणखी काही दिवसांनी भिंतीला जर का तोंड फुटलं तर मग काही खरं नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
“पूर्वग्रह दुषित किंवा एखाद्या व्यक्तीला आयुष्यातून उठवायचंय…”
हा कायदा जेव्हा आपल्याला सांगितलं जातं की तुमच्या विरोधात नाहीच. पण या कायद्यामध्ये जो काय तुम्ही दुजाभाव करत आहात की इकडे रोकड सापडली तरी त्यांना सोडून दिलं. आणि यांना रोकड सापडली म्हणून अटक. म्हणजे तुम्ही एक पूर्वग्रह दुषित किंवा एखाद्या व्यक्तीला आयुष्यातून उठवायचंय मग त्याला एक तर खोटं कांड करून त्याच्यात अडकवा, त्याच्यावरती असे आरोप टाका की बेलच मिळणार नाही. आणि मग न्यायालयासमोर जेव्हा ते प्रकरण येईल. एक-दोन-तीन वर्षांनी तेव्हा त्या तपास यंत्रणा सांगतात आमच्याकडे पुरावे नाहीत यांना सोडून दिलं तरी चालेल. त्याच्या आयुष्यातली तीन-चार वर्षे वाया गेली त्याची भरपाई कोण करणार? आता पवारसाहेब जे म्हणाले की, एका व्यक्तीची तिकडे न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झाली. नेमणूक तुम्ही कशीही करू शकता. तो तुमचा अधिकार आहे. पण आम्हाला जर त्यांच्याबद्दल काही आक्षेप असला, आम्ही काय बोललो तर लेगच आमच्यावरती हातोडा बसणार, अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
“सुप्रीम कोर्टाच्या दरवाज्यात लोकशाही तडफडतेय, प्राण सोडायला आलीय”
सध्या काय झालं आपलं लक्ष भरकटवलं जातंय. लक्ष भरकटवायचं, तुम्ही बसा तिकडे बोंबलत. आम्ही आमचं जे काय इप्सित आहे ते साध्य करून घेतो. मग कोण कबुतरांच्या मागे लागतंय, कोण कुत्र्यांच्या मागे लागतंय. कुत्र्यांच्या प्रकरणावर एक नवीन खंडपीठ नेमलं गेलं. एवढी तत्पुरता आहे. सुप्रीम कोर्टाला मी धन्यवाद देतोय. सरन्यायाधीश म्हणाले की जरी एका खंडपीठाने हा निकाल दिला असला तरी मी स्वतः त्याच्यात लक्ष घालेन. मग मी त्यांना हात जोडून काल विनंती केली, आज परत करतो की सरन्यायाधीश महोदय, आमची म्हणजे केवळ शिवसेनेची नाही, राष्ट्रवादीचीही केस सुरू आहे. या देशात दिवसाढवळ्या पक्ष फोडला जातोय, पक्ष चोरला जातोय. ते तुमचं अनुच्छेद 10 संविधानात आहे की नाही? ढळढळीत दिसतंय तरी आपली सुनावणी चालू आहे. सुनावणी झाली आता बतावणी कधी सुरू होणार? म्हणजे बोलणं कधी सुरू होणार? चालू आहे तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. म्हणून मी त्यांना विनंती केली की, सुप्रीम कोर्टाच्या दरवाज्यात लोकशाही तडफडतेय, प्राण सोडायला आलीय. जरा तिकडे पण लक्ष द्या. नाहीतर हा देश परत एकदा गुलामगिरीच्या दिशेने चाललेला आहे, असा सावधानतेचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
“डोवल रशियाला जाताहेत, पंतप्रधान चीनला जाताहेत…”
मला जे काय दिसतंय ते चित्र अत्यंत भयानक आहे की यांची वाटचाल ही हुकूमशाहीकडे चाललेली आहे. म्हणजे आज हे काय-काय गोंडस नावाने आणताहेत की सर्वसामान्यांना वाटतं, अरे आपल्याला काय घेणं आहे त्यांचं ते बघतिल. चीनमध्ये एखादा माणूस कोणत्याही ठिकाणी कळत-नकळत जर सरकार विरूद्ध बोलला तर तो दोन-तीन दिवसांत अदृश्य होतो. आणखी एक प्रश्न आहे, चीन हा डावा आहे की उजवा? मग पंतप्रधान का चाललेत? डोवल का चाललेत? रशिया डावा आहे की उजवा? मग इकडे कडवे डावे नाहीत, मग ते काय आहेत? रशियाला गेलेले चालतात. डोवल रशियाला जाताहेत, पंतप्रधान चीनला जाताहेत हे डावे आहेत. आणि इकडे जर कोण काय बोललं तर तुम्ही कडवे डावे. हा दुतोंडी नाही, कित्येक तोंडी कारभार यांचा चाललेला आहे ना, हा कारभार देशाला हा अराजकतेकडे घेऊन जाईल. कारण जर का असे न्यायमूर्ती तिकडे नेमायला लागले, न्याय मिळालायला विलंब लागायला लागला, सर्वोच्च न्यायालयाने ईडी वगैरेला कित्येकवेळा कानफटवलं आहे, तरी सुधरत नाहीत. मग जर का दार ठोकून ठोकून न्याय मिळत नाही. राज्यपालांकडे जाऊन सुद्धा अजूनही न्याय मिळत नाही, लक्ष घातलं जात नाही. तर मग जनतेने करायचं काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
“तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून आम्ही या देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईत उतरल्याशिवाय राहणार नाही, हे वचन देतो”
उद्या स्वातंत्र्य दिन आहे. ते स्वातंत्र्य आपल्याला असं तसं मिळालेलं नाही. त्याग करून, बलिदान करून मिळालेलं आहे, सत्याग्रह करून मिळालेलं आहे. आणि ते मिळवायला अनेक वर्षे लागली, अनेकांचे हाल झाले. अनेकांनी बलिदान केलंय. अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत, तेव्हा कुठे हे स्वातंत्र्य मिळालं आहे आपल्याला. पण ते जे कोणी आपल्यासाठी लढले, त्यांना काय माहिती आपण कोणासाठी लढतोय, ते देशासाठी लढत होते. देश म्हणजे देशातील माणसं, दगड धोंडे नाहीत. म्हणजे आपण. आता ते स्वातंत्र्य त्यांनी बलिदान करून जर का आपल्याला मिळवून दिलं असेल तर हे स्वातंत्र्य आपण संघर्ष करून टिकवू शकतो की नाही शकत? आणि ते जर का टिकवायचं असेल तर संघर्ष करण्याशिवाय दुसरा मला मार्ग दिसत नाही. आणि तुमच्या सोबत आहोत. पुढे पाऊल टाका. तुम्हाला कधीही कोणाला मोकळं सोडणार नाही. तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून आम्ही या देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईत उतरल्याशिवाय राहणार नाही, हे वचन देतो, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.