शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्ली दौरा करणार आहेत. 6, 7 आणि 8 ऑगस्ट असे तीन दिवस ते दिल्लीत असणार असून त्यांच्यासोबत शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आणि सौ. रश्मी वहिनीही असणार आहेत, अशी माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली. ते दिल्लीत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत होते.
लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला मिळालेल्या यशानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच दिल्ली दौरा करणार आहेत. या दौऱ्यात अनेक भेटीगाठी होतील. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह दिल्लीत असणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक नेत्यांच्या भेट होतील. अधिवेशन सुरू असलेल्या इंडिया आघाडीतील प्रमुख नेतेही उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचीही भेट होईल, अशी माहिती राऊत यांनी दिली.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभावी रमेश चेन्निथला हे दिल्लीला येणार असून त्यांच्यासोबतही चर्चा होईल. तसेच 6 ऑगस्टला सायंकाळी उद्धव ठाकरे दिल्लीतील मराठी माध्यमांशी, तर 7 ऑगस्टला राष्ट्रीय मीडियाशी संवाद साधतील. हा संवाद दौरा असल्याचेही ते म्हणाले.