
विद्यापीठ अनुदान आयोगाने ( यूजीसी) देशातील 32 बनावट विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांची यादी जाहीर केली. यामध्ये दिल्लीतील 12 विद्यापीठांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्रातील दोन विद्यापीठ या यादीत आहेत. यूजीसीने विद्यार्थी व पालकांना सतर्क राहण्यास सांगितले. बनावट विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
बनावट शैक्षणिक संस्थांच्या यादीत दिल्लीचा नंबर वरचा आहे. दिल्लीमधील दहा तर नवी दिल्लीतील दोन विद्यापीठे ‘फेक’ ठरली आहेत. विशेष म्हणजे यातील काही संस्था यूजीसी मुख्यालयापासून काही मीटर अंतरावर आहेत. त्याखालोखाल उत्तर प्रदेशात 4, केरळ, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात प्रत्येकी दोन तर हरयाणा, राजस्थान, झारखंड आणि अरुणाचल प्रदेशात प्रत्येकी एक बनावट विद्यापीठ आढळून आले आहे.
मागील दोन वर्षांमध्ये देशातील बोगस शैक्षणिक संस्थांची संख्या 20 वरून 32 झाली आहे. यूजीसीने विद्यार्थी आणि पालकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच प्रवेश घेताना यूजीसीच्या संकेतस्थळावर जाऊन बोगस विद्यापीठांची यादी तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील दोन संस्था बोगस
नागपूर येथील राजा अरेबिक युनिव्हर्सिटी आणि सोलापूर जिह्यातील राष्ट्रीय मागासवर्गीय कृषी विद्यापीठ यांचा समावेश बोगस विद्यापीठांमध्ये आहे. अलीकडेच कोलंबिया विद्यापीठाने यूजीजीला पत्र लिहून तक्रार केली आहे की, महाराष्ट्रात त्यांचे नाव आणि लोगो वापरून एक बोगस विद्यापीठ कार्यरत आहे.
यूजीसी फक्त ‘फेक’ विद्यापीठांची यादी जाहीर करते, पण त्यांच्यावर कारवाई करत नाही. याबद्दल शिक्षण क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे.




























































