उजनी धरणाने नियोजित 111 टक्क्यांचा टप्पा गाठला, सोलापूरकरांचे पाण्याचे टेन्शन मिटले

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणात यंदाच्या पावसाळ्यात संथगतीने का होईना, पण 15 ऑक्टोबर रोजी नियोजित 111.23 टक्के पाणीपातळी व 123.28 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुढील वर्षभर पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगधंदे व इतर व्यवसायासाठी पाणी कमी पडणार नसल्याचे चित्र आहे.

पुणे जिल्ह्यातील मावळभाग, भीमाशंकरचे डोंगर व नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात यंदा अतिशय थोडय़ा कालावधीत परंतु खंडित प्रमाणात पाऊस झाल्यामुळे उजनी पाणलोट क्षेत्रातील 19 धरणे भरण्यास विलंब लागला. त्यामुळे जून 21मध्ये असलेली उजनी धरणाची उणे 23 टक्के पाणीपातळी अधिक 62 टक्के होण्यास ऑगस्ट महिनाअखेरपर्यंत वेळ लागला. तोपर्यंत सोलापूर जिल्ह्यातही पावसाने ओढ दिलेली होती. त्यामुळे 5 ते 15 ऑगस्ट 21 दरम्यान शेतीसाठी कालवा, बोगदा व सिंचन योजनेतून पाणी सोडण्यात आले होते. यामुळे त्यावेळी 62.34 टक्क्यांवर पोहोचलेली पाणीपातळी पुन्हा 60.04 टक्क्यांवर आली होती.

अवघा एक महिना पावसाळा बाकी असताना उजनी धरण भरेल की नाही, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात पुणे आणि नगर जिल्ह्यात कमी वेळात जास्त पाऊस झाला. त्यामुळे उजनीच्या पाणीपातळीत वाढ होऊन शुक्रवारी (दि. 15) धरणाच्या नियोजित क्षमतेएवढा म्हणजेच 111.23 टक्के (123.28 टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ापासून उजनीच्या वरती झालेल्या पावसामुळे उजनी धरणातून भीमा नदी, कालवा, बोगदा व सिंचन योजनेतून शेतीसाठी खरिपाचे आवर्तन सुरू ठेवण्यात आले आहे.

पुढच्या महिन्यात होणार पाणीवाटपाचे नियोजन

नोव्हेंबर महिन्यात शासकीय स्तरावर कृष्णा खोरे जलसंपदा विभाग कालवा पाणीवाटप मंडळाची बैठक होऊन उजनीच्या पुढील वर्षासाठी पाणीवाटपाचे धोरण निश्चित केले जाणार आहे. यावेळी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी उपस्थित असतात. यावेळी सोलापूर जिल्हावासीयांना पिण्यासाठी पाणी तसेच शेतीसाठी रब्बी हंगामात व उन्हाळी हंगामासाठी पाण्याची किती आवर्तने द्यायची, याचे नियोजन ठरवण्यात येणार आहे.

नीरा खोऱयातील सर्व धरणे भरली

दरम्यान, नीरा खोऱयातील गुंजवणी, नीरा देवघर, भाटघर, चिलेवाडी व वीर ही धरणे 100 टक्के भरली आहेत. पाणीपातळीवर नियंत्रण ठेवण्यात येत असल्याचे नीरा खोरे नियंत्रण विभागाकडून कळविण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, फलटण तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, अकलूज परिसरात वीर धरणाचे पाणी सर्व क्षेत्रासाठी वापरले जाते.

पाणलोटातील बहुतांश धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा

उजनी धरणाच्या वरील एकूण 19 लहान-मोठय़ा धरणांपैकी वडज, डिंभे, घोड, कळमोडी, चासकमान, भामा-आसखेड, वडिवळे, आंद्रा, पवना, कासारसाई, टेमघर, वरसगाव व पानशेत ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. तर, पिंपळगाव जोगे, मुळशी व खडकवासला ही तीन धरणे 85 ते 90 टक्क्यांपर्यंत भरलेले आहेत. माणिकडोह आणि विसापूर ही दोन धरणे 65 टक्क्यांपर्यंत स्थिरावली आहेत. सध्या धरण नियंत्रण विभागाकडून उजनी जलाशयात 111.23 टक्के पाणीपातळी व 123.28 टीएमसी पाणीसाठा कायम ठेवण्यासाठी भीमा नदी, कालवा, बोगदा व सिंचन योजनेद्वारे कमी प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आगामी पाच ते सहा दिवसांत हेही पाणी बंद करण्यात येणार आहे.

15 ऑक्टोबर 2021 रोजी उजनीची स्थिती

पाणी पातळी – 497. 331 मीटर
एकूण साठा – 3491.31 दलघमी (123.28 टीएमसी)
उपयुक्त साठा – 1688. 40 दलघमी (59.62 टीएमसी)
टक्केवारी – 111.23 टक्के

दौंड इथून येणारा विसर्ग

5187 क्युसेक

उजनी धरणातून होणारा विसर्ग

कालवा – 1700 क्युसेक
बोगदा – 150 क्युसेक
सांडवा – 2500 क्युसेक
सीना-माढा सिंचन योजना – 148 क्युसेक
दहिगाव – 63 क्युसेक