विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण होणार, लंडन कोर्टाची मंजुरी

12

सामना ऑनलाईन । लंडन 

मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या हिंदुस्थान प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. लंडन कोर्टाने मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. मल्ल्याला उच्च न्यायालयात दाद मागण्याची परवानगीही कोर्टाने दिली आहे. परंतु निकालापूर्वी कोर्ट जे निर्णय देईल तो मान्य असेल असे माल्ल्याने माध्यमांशी बोलताना सांगितले होते. मल्ल्या म्हणला होता की, “मी कोणाचेही पैसे चोरले नाही. मी कर्ज घेतले होते आणि ते मी चुकवायला तयार आहे.” कर्जाचा आणि प्रत्यार्पणाचा काही संबंध नसल्याचे त्याने म्हटले.

लंडनमधील सुनावणीदरम्यान सीबीआय आणि ईडीचे दोन अधिकारी उपस्थित होते. मनी लाँड्रिंग मध्ये आरोपी माल्ल्यावर हिंदुस्थानी बँकांचे ९ हजार कोटींचे कर्ज आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ब्रिटनमध्ये त्याला अटक करण्यात आली होती. सध्या जामिनावर मल्ल्या बाहेर आहे.

मनी लाँड्रिंगचे आरोप झाल्यानंतर मल्ल्याने देश सोडला होता. मार्च २०१६ पासून तो लंडनमध्ये स्थायिक आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी हिंदुस्थान सरकार प्रयत्नशील होते. मागच्या वर्षी डिसेंबर पासून लंडनच्या मॅजिस्ट्रेट कोर्टात मल्याच्या विरोधात सुनावणी सुरू झाली होती.

या खटल्यात हिंदुस्थान सरकारकडून क्राऊन प्रोसीक्युशन सर्विस ही संस्था खटला लढवत आहे. या संस्थेचे प्रमुख मार्क समर्स म्हणाले की मानवाधिकाराच्या आधारावर मल्ल्याच्या प्रर्त्यार्पण करण्यात कुठलीच अडचण येणार नाही. तर दुसरीकडे मल्ल्याच्या वकीलाकडून हे सिद्ध करण्याचा प्रयत्न होत आहे की, किंगफिशर एअरलाईन्स संस्थेला आलेल्या अपयशामुळे बँकेचे कर्ज बुडाले. यात कुठलाच प्रकारचा बेईमानी किंवा धोका दिला गेला नाही.

आपण कर्जाची सगळी रक्कम फेडण्यास तयार असल्याचे मल्ल्याने स्पष्ट केले होते. बुधवारी यासंबंधी त्याने ट्विट केले होते. तसेच २०१६ साली आपण कर्ज फेडण्याचा प्रस्ताव दिल्याचेही त्याने म्हटले होते. परंतु हिंदुस्थान सरकारने या प्रस्तावाबाबत काहीच प्रतिसाद दिला नसल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या