रशिया आणि युक्रेनच्या युद्धातील एका घटनेने जागतिक स्तरावर खळबळ उडवली आहे. युक्रेनने रशियावर अमेरिकेच्या ‘9/11’सारखा हल्ला केला. या हल्ल्यात एक ड्रोन उंच इमारतीला धडकले. त्यामुळे इमारतीला भगदाड पडले आणि आगीचे लोळ उठले. रशियाच्या सेराटोवमध्ये सर्वात उंच इमारतीवर युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यामुळे शहरात दहशत पसरली.
रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात चारजण जखमी झाले आहेत. सेराटोव भागाचे गव्हर्नर रोमन बुसारगिन यांनी सांगितले की, 38 मजली बोल्गा स्काय निवासी परिसरातील इमारतीला निशाणा बनवण्यात आले. या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सेराटोवव्यतिरिक्त एंगेल्स शहरातही इमारतीला ड्रोनने धडक दिली. या हल्ल्यात एका निवासी इमारतीच्या वरच्या मजल्यांचे मोठे नुकसान झाले.
युक्रेनच्या हल्ल्यानंतर रशियानेही जोरदार प्रत्युत्तर दिले. युक्रेनच्या कीव, खारकीव, ओडेसा, लीवसह 12 शहरांवर 100 मिसाइल आणि 100 ड्रोन डागण्यात आले. या हल्ल्यात पाच लोकांचा मृत्यू झाला आहे.