अमेरिकेतील 9/11 प्रमाणे युक्रेनचा रशियाच्या सर्वात उंच इमारतीवर ड्रोन हल्ला, पाहा व्हिडीओ

मागच्या दोन वर्षांहून अधिक काळ रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून आता ते आणखी तीव्र होताना दिसत आहे. युक्रेनने रशियाची सर्वात उंच इमारत वोल्गा स्कायवर हल्ला केला आहे. हा हल्ला रशियातील सारातोव शहरात झाला आहे, त्याचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. हा हल्ला ड्रोनच्या माध्यमातून केला असून ज्याच्या धडकेने इमारतीला आग लागून त्याचा एक भाग पूर्णपणे कोसळला आहे.

रशियाच्या सारातोव शहरातील ही 38 मजली इमारत असून रशियातील ती सर्वांत उंच इमारत म्हणून ओळखली जाते. त्या इमारतीत अनेक कंपन्यांची कार्यालये आहेत. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत पाहिले जाऊ शकते की, युक्रेनचे ड्रोन वेगाने इमारतीच्या दिशेला जाऊन धडकले आणि त्यानंतर आग लागली. या हल्ल्यात दोन लोकं जखमी झाले आहेत. मात्र ज्या प्रकारे युक्रेनने रशियाच्या सर्वात उंच इमारतीवर हल्ला केला. रशियासाठी हा एक मोठा धक्का आहे. ड्रोन इमारतीला धडकल्याने इमारतीचे प्रचंड नुकसान झाले असून इमारतीचा एक भाग पूर्णपणे कोसळला आहे. या भागाचे गव्हर्नर रोमन बासुरगिन यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. त्यांनी टेलिग्रामवर याबाबत सांगितले की, हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेची परिस्थिती गंभीर आहे. डॉक्टर त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. तिच्यासोबत आणखी एकजण जखमी आहे.

मागच्या दोन वर्षांहून अधिक काळ रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष सुरु आहे, आतापर्यंत या संघर्षात रशिया वरचढ होती, मात्र नुकतेच युक्रेनच्या लष्कराने रशियाच्या कुर्स्क भागात हल्ला करून अनेक किलोमीटरपर्यंत घुसखोरी केली होती. यानंतर रशियानेही युक्रेनवर हल्ले तीव्र केले आहेत. अशाप्रकारे गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये सुरू असलेले युद्ध अधिक तीव्र झाले आहे.