सावधान! कोरोना मृत्यूंची संख्या वाढतेय, देशभरात दोन दिवसांत 21 मृत्यू; केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. देशभरात गेल्या दोन दिवसांत 21 जणांचा मृत्यू झाला असून त्यांना विविध सहव्याधी होत्या, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. या सहव्याधींमध्ये कोरोनाच्या तीन लसी घेतलेल्या रुग्णांचाही समावेश आहे. दरम्यान, केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 1400 वर पोहोचली असून ती देशातील सर्वाधिक संख्या आहे.

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असून सक्रिय रुग्णांची संख्या आतापर्यंत 3 हजार 783 वर पोहोचली आहे.  महाराष्ट्रात 485 आणि दिल्लीत 436 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 48 तासांत हजारहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, घाबरून जाऊ नये, ताप किंवा इतर लक्षणे आढळल्यास कोरोना चाचणी करावी, असे आवाहन पेंद्रीय आरोग्य विभाग आणि राज्य सरकारच्या वतीने करण्यात आले आहे.

तीन डोस घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू

पेंद्रीय आरोग्य विभागाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून दरदिवशी वाढणाऱ्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. देशात जानेवारीपासून कोरोनामुळे 28 मृत्यू झाले आहेत. त्यापैकी गेल्या दोन दिवसांत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी बंगळुरूमध्ये एका 63 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याला दोन्ही लसींसह बूस्टर डोस देण्यात आला होता. दिल्लीत एका 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. महाराष्ट्र आणि केरळमध्ये मृत्यूचे प्रमाण  सर्वाधिक असून आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापुरात कोरोनामुळे वृद्धेचा मृत्यू

जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने पुन्हा एकदा डोके बाहेर काढले आहे. देशभरात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. कोल्हापुरातही कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला असून, मूळच्या सांगलीतील पलूस येथील 73 वर्षीय महिलेचा रविवारी छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यात 9 हजारांहून अधिक कोरोना चाचण्या

महाराष्ट्रात शनिवारी कोविडचे 68 नवीन रुग्ण आढळले. जानेवारी 2025 पासून मुंबईत एकूण 749 रुग्ण आढळले आहेत. जानेवारीपासून राज्यात 9 हजार 592 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. दरम्यान, जम्मू आणि कश्मीरमध्ये कोरोनाचे दोन रुग्ण सापडले. हे दोन्ही रुग्ण केरळचे असून श्रीनगरमधील सरकारी दंत महाविद्यालयात शिकत आहेत. मिझोराममध्ये कोरोनाचे दोन रुग्ण सापडले आहेत.

चार प्रकारचे व्हेरिएंट 

देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली असून कोरोनाचे चार नवीन प्रकारचे व्हेरिएंट आढळले आहेत. दक्षिण आणि पश्चिम हिंदुस्थानात एलएफ.7, एक्सएफजी, जेएन.1 आणि एनबी.1.8.1 असे हे व्हेरिएंट आहेत. दरम्यान, पेंद्रीय आरोग्य विभागाकडून देशभरातील कोरोनाचे सॅम्पल घेतले जात असून त्यानुसार सूचना दिल्या जात आहेत. कोरोनाचे चार प्रकार सापडले असले तरी ही सर्व प्रकरणे गंभीर नाहीत, लोकांनी घाबरून जाऊ नये, सावधगिरी बाळगावी, असे आवाहन  ‘आयसीएमआर’चे संचालक डॉ. राजीव बहल यांनी केले आहे.