उमेद: शेतीविकासाची मार्गदर्शक

>>अनघा सावंत ([email protected])

शेतकऱयांच्या वेदनेवर फुंकर घालत त्यांना सेंद्रिय शेतीविषयक मोलाचे मार्गदर्शन करणारी संस्था म्हणजे नगर येथील ‘ऋषी-कृषी प्रतिष्ठान’ ही संस्था.

शेती करताना शेतकऱयाला लहरी हवामान, शेतीमालाला मिळणारा अनिश्चित बाजार भाव, शेतीचा वाढलेला उत्पादन खर्च, जमिनीची खालावलेली उत्पादन क्षमता, ओला-कोरडा दुष्काळ इ. अनेक संकटांचा सामना करावा लागतो. तरीही ऊन, पाऊस, थंडी कशाचीही पर्वा न करता हा जगाचा पोशिंदा दिवस-रात्र शेतात राबत असतो. मात्र आर्थिकदृष्टय़ा अपयश पदरी पडल्यावर निराश होतो. शेतकऱयाच्या याच वेदनेवर फुंकर घालत त्यांना सेंद्रिय शेतीविषयक मोलाचे मार्गदर्शन करणारी संस्था म्हणजे नगर येथील ‘ऋषी-कृषी प्रतिष्ठान’ ही संस्था.

संस्थेचे संचालक राजेंद्र प्रल्हाद सांबरे हे असून 1920 मध्ये कृषी आणि दुग्ध शास्त्राचे उच्च शिक्षण घेतल्यानंतर पूर्णवेळ शेती व्यवसाय स्वीकारला. मात्र शेतीविषयक विविध समस्या अनुभवल्यानंतर आर्थिकदृष्टय़ा शेती परवडत नाही असे त्यांच्या लक्षात आले. याविषयी ते म्हणाले, “रासायनिक शेतीला पर्याय शोधल्याशिवाय शेती परवडणार नाही हे समजल्यावर मी पर्यायी शेतीपद्धतीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी सेंद्रिय शेती हा आशेचा किरण मला दिसला आणि मी सेंद्रिय शेती ‘ऋषी-कृषी’ स्वीकारली. या शेतीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार काम सुरू केले. ठरावीक प्रमाणात पाणी आणि गोमूत्र एकत्रित करून पिकांवर फवारणी केली. अमृतपाणी (एक एकरसाठी- 10 किलो देशी गायीचे शेण, अडीचशे ग्रॅम गायीचे तूप, अर्धा किलो मध 200 लिटर पाण्यात एकत्रित करून तयार केलेले मिश्रण) आणि गोमूत्र वापरामुळे शेतीचा उत्पादन खर्च बराच कमी झाला. 70 टक्के खर्चात बचत झाली. जमिनीची उत्पादन क्षमता वाढली. पिकांचे उत्पादन रासायनिक शेतीपेक्षा दीडपट वाढले आणि शेती आर्थिकदृष्टय़ा परवडणारी झाली. सेंद्रिय शेतीचे संशोधक आर्यकृषक मोहन शंकर देशपांडे यांच्या सहकाऱयाने ऋषी-कृषी पद्धतीचा प्रचार आणि प्रसार करण्याची संधी मला मिळाली. तसेच त्यांच्या या कार्यातून प्रेरणाही मिळाली.”

ग्रामीण भागात शेतकऱयांना सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन करता यावे या उद्देशाने 1996 मध्ये राजेंद्र यांनी ‘ऋषी-कृषी प्रतिष्ठान’ची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून शेतकऱयांना ‘ऋषी-कृषी’ सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन केले जाते. याशिवाय शेतकऱयांसाठी कार्यशाळा, प्रात्यक्षिके, चर्चासत्रे आयोजित केली जातात. तसेच प्रत्यक्ष शेतावर जाऊन कामही केले जाते.

गेल्या 28 वर्षांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांतील शेतकऱयांना या सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण संस्थेने दिले. आज हजारो शेतकरी या पद्धतीने शेती करत आहेत. पीक नियोजन, शेतीमाल प्रक्रिया आणि विपणन यांचेही मार्गदर्शन केले जाते. या शेतीमुळे हजारो शेतकऱयांनी देशी गोपालन सुरू केले आहे. शेती ही आर्थिकदृष्टय़ा परवडली पाहिजे यासाठी सुरू केलेले कार्य यशस्वी झाले आहे, अशी भावना राजेंद्र यांनी व्यक्त केली.

या उपामात सहभागी शेतकरी समूहांना शेतीमाल उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. तसेच आज तोटय़ात असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या फायद्यात कशा येतील यासाठीही मार्गदर्शन केले जाते. संस्थेने रसायनमुक्त गाव आणि गो आधारित शेती असे 14-15 गावांमध्ये काम केले आहे. गेल्या दहा वर्षांपासून कमिन्स फाऊंडेशन, सुदर्शन केमिकल्स, बजाज, तसेच इतर बहुराष्ट्रीय कंपनींच्या सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) तून ग्रामीण भागात शेती विकासाचे काम केले जाते. या कामात ‘ऋषी-कृषी प्रतिष्ठान’चा मोठा सहभाग आहे.