हिंदुस्थानची ही अनोखी मंदिरं तुम्ही पाहिलीत का?

हिंदुस्थानच्या संस्कृतीचा वारसा जपणारी अनेक मंदिरं आज ठिकठिकाणी पाहायला मिळतात. पण, हिंदुस्थानात अशीही काही मंदिरं आहेत जी संस्कृतीचा एक अनोखा वारसा पुढे चालवत आहेत. यातील बहुतांश मंदिरांना वैज्ञानिक, ऐतिहासिक, पौराणिक आणि कलात्मक अधिष्ठानं आहेत. जाणून घेऊया अशाच काही अनोख्या मंदिरांविषयी-

१. विजय विठ्ठल मंदिर, हम्पी, कर्नाटक-

vijaya_vittala_temple-hampi

हम्पीमधील विजय विठ्ठल मंदिर तुंगभद्रा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेलं द्रविडी स्थापत्यशैलीतलं एक सुंदर मंदिर आहे. याचं बांधकाम चौदाव्या शतकात करण्यात आलं. इतर कोणत्याही दाक्षिणात्य मंदिरासारख्याच असणाऱ्या या मंदिराचं एक खास वैशिष्ट्य आहे. या मंदिरात ५६ स्तंभ आहेत. हे स्तंभ म्युझिकल पिलर्स म्हणजेच संगीतस्तंभ म्हणून ओळखले जातात.

musicl-pillars-vitla-temple

या स्तंभांना हातांनी वाजवल्यानंतर घट, पखवाज यांसारख्या तालवाद्यांचे आवाज येतात. असं म्हणतात की पूर्वी या मंदिरात जेव्हा आरती किंवा भजनं होत, तेव्हा या स्तंभांचा वापर तालवाद्यांप्रमाणे केला जात असे. याखेरीज या मंदिरात केलं गेलेलं कोरीवकामही अतिशय सुंदर आहे.

२. लेपाक्षी येथील वीरभद्र मंदिर, आंध्रप्रदेश-

lepakshi-temple

लेपाक्षी हा ‘ले पक्षी’ या तेलुगू शब्दाचा अपभ्रंश आहे. ‘ले पक्षी’ म्हणजे ‘उठ पक्षी’. या मंदिराला रामायण काळापासूनचा इतिहास आहे. सीतेला घेऊन जाणाऱ्या रावणावर जटायू या पक्षाने हल्ला केला. त्यात जटायू जखमी होऊन जिथे कोसळला आणि त्याने प्राण सोडण्याआधी श्रीरामांनी जिथे त्याची ‘ले पक्षी’ असं म्हणत गळाभेट घेतली, ते ठिकाण म्हणजे लेपाक्षी. इथे असलेलं वीरभद्र मंदिर त्या पुराणकाळाची साक्ष देतं. पण, त्याहीपेक्षा एक खास गोष्ट या मंदिरात आहे.

lepakshi-hanging-piller

या मंदिरात एकूण ७० खांब आहेत. मात्र, त्यातला एक खांब हा जमिनीपासून काही अंतरावर आहे. त्यामुळे तो चक्क लटकल्यासारखा वाटतो. गंमत म्हणजे हे सर्व खांब मंदिराच्या दगडी छताला तोलून धरण्याचं काम करतात, तरीही हा एकच खांब तेवढा हवेत का? याचं उत्तर मात्र भल्याभल्यांना देता आलेलं नाही. काही जणांना ही मंदिराला बनवणाऱ्या आर्किटेक्टची चूक वाटते, तर काही जण या खांबाला भूकंप झाल्यानंतर मंदिराला स्थिर ठेवण्याची व्यवस्था मानतात.

३. ब्रम्हा मंदिर, पुष्कर, राजस्थान-

brahma-temple-pushkar

जगनिर्माता ब्रम्हदेवाचं हे जगातलं एकमेव मंदिर आहे. पुष्कर हे ठिकाणं ब्रम्हदेवाचं निवासस्थान मानलं जातं. याची एक दंतकथा सांगितली जाते. एका धार्मिक अधिष्ठानासाठी ब्रम्हदेवांना सपत्नीक बसायचं होतं, मात्र देवी सरस्वतीने विलंब केल्यामुळे संतापून त्यांनी दुसऱ्या स्त्रीसोबत विवाह केला. ही वार्ता समजताच देवी सरस्वती संतापली.

brahma-statue

संतापलेल्या सरस्वतीने ब्रम्हदेवांना पृथ्वीतलावर कुठेही तुमचं मंदिर असणार नाही, असा शाप दिला. मात्र, राग शांत झाल्यानंतर पुष्कर या एकमेव ठिकाणी तुमचं मंदिर असेल, असा उःशापही दिला. म्हणून ब्रम्हदेवांचं हे जगभरातलं एकमेव मंदिर आहे.

४. सूर्य मंदिर, कोणार्क, ओडिशा-

sun-temple-konark

तेराव्या शतकात बनलेलं हे मंदिर सूर्याला आणि सौरचक्राला समर्पित आहे. कोणार्क या शब्दाची निर्मिती कोण आणि अर्क या शब्दांच्या संधीतून झाली आहे. अर्क म्हणजे सूर्य आणि कोण म्हणजे कोन किंवा किनारा. कोणार्क हे मंदिर पुरी या प्रदेशाच्या ईशान्य दिशेच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. म्हणून या मंदिराला कोणार्क असं संबोधलं जातं.

wheels-of-temple

या मंदिराची रचना पौराणिक कथांमध्ये ज्या सूर्यरथाचं वर्णन आढळतं त्या रथासारखी आहे. या रथाला १२ महिन्यांची प्रतीक असेली १२ चाकं आहेत. या चाकांवरच्या आऱ्या या आठवड्यातल्या सात दिवसांची प्रतीक आहेत. सौरचक्रानुसार निसर्गात होणाऱ्या ऋतुबदलांची नक्षी या चाकांवर कोरलेली आहे. थोडक्यात हे मंदिर एका प्रकारचं सौर कॅलेंडर आहे.

५. कैलास मंदिर, वेरुळ, महाराष्ट्र-

kailas-temple

माणिकेश्वर असं मूळ नाव असलेलं हे कैलास मंदिर महाराष्ट्राच्या संस्कृतीचं लेणं आहे. या मंदिराची रचना कैलास पर्वताला नजरेसमोर ठेवून केली गेली आहे. या संपूर्ण मंदिराची रचना एखाद्या रथासारखी आहे. पुढे सारथी आणि मागे स्वामी अशा रचनेचं हे कैलास मंदिर हिंदुस्थानी शिल्पकलेचा एक अजोड नमुना आहे.

kailash-rath

इतिहासकार- जाणकारांच्या म्हणण्यानुसार शिल्पकारांनी नियोजित खोदकामाचा आराखडा तयार केल्यावर सोयीचा मोठा खडक मूळ डोंगरापासून वेगळा करून घेतला. नंतर शिखरापासून खोदकामाला सुरुवात करण्यात आली. त्या काळच्या प्रचलित पद्धतीनुसार ही लेणी म्हणजे मंदिर बांधकाम नव्हे, तर कल्पकतेने कोरीव कामातून साकारल्याने कैलास मंदिर हे शिल्पच आहे. विशेष म्हणजे, शिखर ते पायथा असं घडवलं गेलेलं हे जगातलं एकमेव मंदिर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या