
‘अनलाईकली पॅराडाईज’मध्ये आमचा संघर्ष आहे, रडगाणे नाही, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाची ‘अनलाईकली पॅराडाईज’ ही इंग्रजी तर ‘नरक में स्वर्ग’ ही हिंदी आवृत्तीचा आज प्रकाशन सोहळा दिल्लीतील कॉन्स्टिट्यु क्लब, मावळणकर सभागृह येथे पार पडला. यावेळी बोलताना ते असे म्हणाले आहेत.
या पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री, आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, खासदार दिग्विजय सिंह, तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील गटनेते डेरेक ओब्रायन, आप खासदार संजय सिह, टीएमसी खासदार साकेत गोखले, 4 PM न्यूजचे मुख्य संपादक संजय शर्मा यांच्या उपस्थित झाले.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “या मंचावर असे दिग्गज लोक बसले आहेत जे कधी कोणाला घाबरले नाहीत. आमच्या समोर जे लोक बसले आहेत, ते देखील हिंमतवाले लोक आहेत. कपिल सिब्बल, अरविंद केजरीवाल, संजय सिंह, साकेत गोखले आणि ज्यांनी हे पुस्तक प्रकाशित करण्याची हिंमत दाखवली ते माझे पब्लिकेशनचे मित्र. खूप लोकांनी हे पुस्तक नाकारले होते, पण त्यांनी मी जसे लिहिले होते तसेच ते प्रकाशित केले. लोकसभेचे पहिले स्पीकर जे.व्ही. मावळणकर यांचा आज स्मृतीदिन आहे, त्यानिमित्त आम्ही हा कार्यक्रम करत आहोत. आजच्या संसदीय लोकशाही व्यवस्थेत त्यांचे मोठे योगदान आहे, पण आजची संसद पाहताना त्यांची वारंवार आठवण येते.”
संजय राऊत म्हणाले, “हे पुस्तक ‘अनलाईकली पॅराडाईज’, आमच्या लढाईचा एक भाग आहे. हे पुस्तक आधी मराठीत प्रसिद्ध झाले असून गेल्या सहा महिन्यांपासून चर्चेत आहे. हा केवळ माझा संघर्ष नाही, तर हा केजरीवाल यांचा, संजय सिंह यांचा आणि आपल्या सर्वांचा संघर्ष आहे. आम्ही तुरुंगात गेलो, आणखी लोक जातील, पण आता लोकांच्या मनातील भीती संपली आहे.”
ते म्हणाले, “दोन वर्षांपूर्वी देशाची जी अवस्था होती, ती सोपी नव्हती. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका निवडून आलेल्या मुख्यमंत्र्याला (अरविंद केजरीवाल) उचलून नेले गेले. हेमंत सोरेन यांना नेले, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना नेले. आमच्या सारख्या खासदारांना वर्ष-वर्ष तुरुंगात ठेवले. या पुस्तकात ती सर्व व्यथा आणि वेदना आहे, पण त्यात आमचे रडगाणे नाही, तर आमचा संघर्ष आहे.”
संजय राऊत म्हणाले की, “जेव्हा मराठीत हे पुस्तक आले, तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते की, यात संजय राऊत कुठेही रडताना दिसत नाहीये. तुरुंगात जमिनीवर झोपावे लागते, चांगले जेवण मिळत नाही, हे तर होणारच, त्यासाठीच तर ते आपल्याला तिथे ठेवतात जेणेकरून आपण तुटून पडू किंवा त्यांच्या पायाशी लोळण घेऊ. पण आम्ही कोणीही शरण गेलो नाही. आता हळूहळू देशातील वातावरण बदलत आहे. आज खूप दिवसांनी आम्ही नरेंद्र मोदींना लोकसभेत पाहिले, ते देखील आता तिथे यायला घाबरू लागले आहेत. म्हणजेच जनता आणि आपण सर्वजण आता पंतप्रधानांनाही भारी पडत आहोत. ज्यांच्यामुळे आम्हाला हे सोसावे लागले, त्यांनाही एक दिवस तिथे पाठवू.”
ते पुढे म्हणाले की, “तुरुंगात गेल्यावर कळते की, आपला खरा मित्र कोण आणि शत्रू कोण. जे गुन्हेगार आत बसले आहेत ते शत्रू नाहीत, तर जे सत्तेत बसून यंत्रणांचा गैरवापर करत आहेत, ते देशाचे खरे शत्रू आहेत. सत्ताधारी, पंतप्रधान, गृहमंत्री किंवा ईडी-सीबीआयचे प्रमुख हे सत्याचा सामना करू शकत नाहीत, ते डरपोक आहेत.”
राऊत म्हणाले, “तुरुंगातून बाहेर आल्यावर असे वाटते की हा देशच एक मोठा तुरुंग बनला आहे. हे पुस्तक केवळ माझी कथा नाही, तर सीबीआय किंवा ईडीने खोट्या गुन्ह्यात अडकवलेल्या प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याची आणि लोकशाही वाचवण्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक नागरिकाची ही कहाणी आहे. मी केवळ पुस्तक लिहिले आहे, पण हा अनुभव तुम्हा सर्वांचा आहे. हा अनुभव आपण जनतेपर्यंत आणि देशाबाहेरही पोहोचवला पाहिजे.”



























































