
हिंदुस्थानी सायकलिंगच्या इतिहासात नवे पर्व सुरू होत असून पहिलीच बजाज पुणे ग्रॅण्ड टूर ही पुरुषांची आंतरराष्ट्रीय सायकलिंग शर्यत जागतिक स्तरावर नवा इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाली आहे. युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल (यूसीआय) मान्यताप्राप्त 2.2 श्रेणीतील या शर्यतीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून पाच खंडांतील 35 देशांचे प्रतिनिधित्व करणारे 29 आंतरराष्ट्रीय संघ आणि विक्रमी 171 एलिट सायकलपटू पुण्यात सहभागी होणार आहेत. 19 ते 23 जानेवारीदरम्यान होणारी ही शर्यत पुण्याला जागतिक प्रोफेशनल सायकलिंग सर्किटवर महत्त्वाचे स्थान मिळवून देणारी ठरणार आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी आणि या दौऱयाचे प्रभारी अधिकारी जितेंद्र डुडी तसेच शर्यतीचे तांत्रिक संचालक पिनाकी बसाक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुणे जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र सरकारच्या भक्कम पाठिंब्याने आयोजित करण्यात आलेली ही पाच दिवसांची 437 किलोमीटर लांबीची शर्यत सायकलिंगच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणार आहे.
सामान्यतः यूसीआय 2.2 श्रेणीतील शर्यतींमध्ये जास्तीत जास्त 125 सायकलपटू सहभागी होतात, मात्र बजाज पुणे ग्रॅण्ड टूरमध्ये 171 सायकलपटूंचा सहभाग निश्चित झाल्याने या श्रेणीतील ही आजवरची सर्वांत मोठी स्पर्धा ठरणार आहे. यामध्ये ओडिशामध्ये झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतून निवडलेल्या सहा हिंदुस्थानी सायकलपटूंच्या संघाचाही समावेश आहे.
खंडनिहाय पाहता, आशियातून सर्वाधिक 78, युरोपमधून 69, ओशनियामधून 12, अमेरिकेतून 6 आणि आफ्रिकेतून 6 सायकलपटू पुण्यात दाखल होणार आहेत. फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, बेल्जियम, जर्मनी, नेदरलॅण्ड्स, ऑस्ट्रेलिया, चीन आणि थायलंडसारख्या आघाडीच्या सायकलिंग राष्ट्रांचा सहभाग या शर्यतीचे जागतिक महत्त्व अधोरेखित करते.
ही शर्यत केवळ क्रीडा स्पर्धा न राहता पुण्याची ऐतिहासिक, सांस्पृतिक आणि भौगोलिक ओळख जागतिक व्यासपीठावर मांडणारा भव्य क्रीडा उत्सव ठरणार आहे. शहरातील ऐतिहासिक स्थळांपासून ते दख्खनच्या पठारावरील आव्हानात्मक घाटांपर्यंत सायकलपटूंना विविध भूप्रदेशांचा सामना करावा लागणार आहे. विक्रमी सहभाग, जागतिक दर्जाची स्पर्धा आणि पुण्याच्या वैभवशाली पार्श्वभूमीमुळे बजाज पुणे ग्रॅण्ड टूर ही स्पर्धा हिंदुस्थानी सायकलिंगच्या इतिहासातील एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार असून पुणे आता जागतिक सायकलिंग नकाशावर ठळकपणे झळकणार आहे. या स्पर्धेत एक आठ किलोमीटरचा प्रोलॉग आणि चार प्रमुख टप्प्यांचा समावेश आहे.




























































