
गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीच्या तडाख्यातून शेतकरी अजून पुरता सावरला नाही तोच सोमवारी पुन्हा मराठवाड्याला अवकाळीचे ग्रहण लागले! मराठवाड्यासह पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. मराठवाड्यातील लातूर, परभणी, बीड तसेच नांदेड जिल्ह्यात तर पूर्व विदर्भातील नागपूरसह भंडारा, गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. रेणापूर भागाला तुफान गारपिटीने झोडपून काढले. यामुळे अनेक कुंटुंबाचा संसार उघड्यावर पडला आहे. नागरिकांच्या घरात पाणी शिरल्य़ाने घरातील सामान भिजले आहे.
































































