
सातपुडा पर्वतरांगेतील नंदुरबार जिल्ह्याला अवकाळी पावसाने गेल्या काही दिवसांपासून झोडपले असून, आंब्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातही आदिवासीबहुल भागातील आमचूर व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे, त्याच्या दरातही मागील वर्षीपेक्षा घसरण झाली आहे.
या जिल्ह्यात प्रामुख्याने धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासी बांधव कैऱ्यांचे काप करून वाळवतात, हा माल ते व्यापाऱ्यांना पुरवतात. याला उत्तर हिंदुस्थानातून मोठी मागणी असते. त्यापासूनच आमचूर अर्थात भूकटी तयार केली जाते. नंदुरबार जिल्ह्यातील बांधवांच्या उदरनिर्वाहाचे हे एक महत्त्वाचे साधन आहे. यावर्षी आंब्याला चांगला मोहोर आलेला होता, त्यामुळे या हंगामाकडून उत्पादकांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, गेल्या आठवडाभरापासून वादळासह अवकाळी पावसाने अपेक्षांवर पाणी फेरले. या तडाख्याने मोठ्या प्रमाणात छोट्या कैऱ्या गळून पडल्या, अनेक कैऱ्या फुटल्या आहेत. मे महिन्यातील वातावरण पूर्णतः बदलले आहे. यामुळे आमचूर उत्पादनाचा हंगामच लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऊन नसल्याने कैरीचे काप नीट वाळवणे अशक्य झाले आहे. परिणामी, व्यापाऱ्यांकडून समाधानकारक भावही मिळत नाही. मोलगी व धडगाव बाजारात सध्या आमचूरसाठीचे हे काप 50 ते 150 रुपये प्रतिकिलो भावाने खरेदी केले जात आहेत. त्याला मागील वर्षी 100 रुपयांपासून पुढे दर मिळत होता, त्यामुळे आमचूर उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत.