
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंमत असेल तर मुझफ्फरनगरमधून भाजपच्या बळावर लढण्याऐवजी स्वबळावर निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिले आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. भाजप पुन्हा सत्तेवर येण्यासाठी उतावीळ झाला आहे. त्यावर एका मुलाखतीमध्ये बोलताना टिकैत यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला. योगी मथुरेतून निवडणूक लढवणार? या प्रश्नाला उत्तर देताना टिकैत यांनी स्मितहास्य करत, योगींनी मुझफ्फरनगरमधून निवडणूक लढवली तर बरे होईल अशी प्रतिक्रिया दिली.
राममंदिराच्या मुद्दय़ावरही टिकैत यांनी विधान केले. दुसरे मंदिर का बांधले पाहिजे, असा सवाल करत त्याऐवजी रुग्णालये, शाळा का बांधल्या जात नाहीत असे ते म्हणाले. अयोध्येतील राममंदिर भाजप आपल्या पक्षाच्या निधीतून बांधत आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. बेरोजगारांना रोजगार देण्याचे काम योगींनी करावे असेही ते म्हणाले.



























































