
झाडाखाली झोपलेला असताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गाळ टाकल्याने उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वृत्तसमोर आलं आहे.
उत्तर प्रदेशातील बरेली महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाडाखाली आराम करणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
सुनील कुमार (वय 45 वर्ष) असे मृताचे नाव आहे. तो त्याच्या घराजवळील एका झाडाखाली आराम करत होता. शहरातल्या नाल्यातून गाळ काढण्याचे काम सुरू होते. हे काम सुरू असताना नाल्यातून काढलेला गाळ घेऊन जाणारी ट्रॉली झाडाजवळ रिकामी करण्यात आली. मात्र ज्याठिकाणी गाळ ओतला जात आहे तिथे कुणी आहे का याची खात्री न करताच गाळ ओतण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, बरेलीमध्ये नाले साफ केले जात होते आणि काढलेला गाळ शहराबाहेर ट्रॉलीतून टाकला जात होता. भाजीपाला विकणारा सुनील काम संपवून झाडाखाली झोपला होता तेव्हा ही घटना घडली. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कसलीही खात्री न करता सुनीलवर गाळाने भरलेली ट्रॉली टाकली. गाळ टाकल्याचा आवाज आल्यानंतर आजूबाजूचे लोक त्याठिकाणी जमले. त्यांनी झाडाखाली एकजण झोपला असल्याचे महापालिका कर्मचाऱ्यांना सांगितले. महापालिका कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर काढून रुग्णालयात नेले तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता, असे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
दरम्यान, चौकशी सुरू आहे आणि निष्काळजीपणाबद्दल कंत्राटदारावर कारवाई केली जाईल, असे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
UP Man Dies as Sludge Dumped on Him by Civic Workers While Sleeping Under Tree in Bareilly