
प्रेयसीबरोबर लग्न करण्यासाठी स्वत:च्याच मृत्युचा बनाव रचणाऱ्या एका आरटीआय कार्यकर्त्याला उत्तर प्रदेश येथील जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर त्याच्या प्रेयसीला 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. चंद्रमोहन शर्मा असे त्याचे नाव असून प्रीती नागर असे त्याच्या प्रेयसीचे नाव आहे.
1 मे 2014 साली कासना भागात जेपी ग्रीन जवळ कारमध्ये एका व्यक्तीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. तो मृतदेह चंद्रमोहन शर्माचा असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर मृत चंद्रमोहनच्या पत्नीने सविताने पतीच्या हत्येचा संशय व्यक्त करत कासना येथील 4 जणांविरोधात खुनाचा खटला दाखल केला होता. गावातील काहीजण बेकायदेशीररित्या मंदिर उभारत होते. त्यासंदर्भात चंद्रमोहन याने माहितीच्या अधिकाराअंतर्गत मंदिराशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी अर्ज केला होता. यामुळेच त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप सविताने केला होता. पण तपासामध्ये पोलिसांना वेगळेच काही दिसून आले.
त्यामुळे याप्रकरणाला नवीन वळण लागले होते. काही वैद्यकिय चाचण्यांवरुन मृत व्यक्ती चंद्रमोहन नसल्याचे समोर आल्याने पोलिसही चक्रावले. त्यानंतर पोलीस मिळालेल्या माहितीच्या आधारे बंगळुरू येथे पोहचले.
तेथे त्यांना चंद्रमोहन जिवंत असून तो त्याची प्रेयसी प्रीती नागर बरोबर राहत असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना अटक केली.चौकशीदरम्यान प्रीती व आपले प्रेमसंबंध असून तिच्याबरोबर लग्न करुन राहायचे असल्यानेच मृत्यूचा बनाव रचल्याचे चंद्रमोहन याने सांगितले. त्यासाठी एका विक्षिप्त व्यक्तीची हत्या केली व मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्याचा मृतदेह कारमध्ये जाळल्याची कबुली चंद्रमोहन याने पोलिसांसमोर दिली. न्यायालयाने उपलब्ध पुराव्याच्या आधारावर चंद्रमोहन याला पन्नासहजार रुपयाचा दंड ठोठावत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर प्रीतीला हत्येच्या कटात सामील असल्याप्रकरणी 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.



























































