मंदिरांमधील दानपेटीमध्ये भक्तांकडून मोठ्या भक्तीभावाने दान केले जाते. मात्र उत्तर प्रदेशात दानपेटीच लुटून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कहर म्हणजे दान पेटीवरुन झालेल्या वादात पुजाऱ्याच्या मुलाची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील मिर्झापुरमधील गुरसंडी गावामध्ये सदर घटना घडली आहे. गावात असणाऱ्या मंदिरामध्ये भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिरा बाहेर दानपेटी ठेवण्यात आली होती. या दरम्यान काही लोकांनी दानपेटी तोडून त्यातले पैसे चोरून नेल्याचा आरोप करण्यात आला. यावरुन मोठा वाद झाला. सदर दानपेटीतून पैसे चोरल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. यावरुन मंदिराचे पुजारी असणाऱ्या कृपाशंकर यांच्या मुलाचा आणि श्रीनारायन दुबे यांचा वाद झाला. हा वाद टोकाला गेला आणि श्रीनारायण दुबे याने श्रवण पांडे याच्या डोक्यात गोळी घातली. यात श्रवण पांडे याचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिरात भंडाऱ्याच्या निमीत्ताने दानपेटी ठेवण्यात आली होती. यावरुन दोन गटांमध्ये वाद झाला. तसेच गोळीबार झाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.