सोनभद्रच्या सोन्याच्या साठ्याचा अर्थव्यवस्थेला आधार!

2092

उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यात सोन्याचा मोठा साठा सापडल्याने अचानक हा जिल्हा चर्चेत आला आहे. या भागात सोन्याचा 3 हजार टनांपेक्षा जास्त सोन्याचा साठा असल्याची पृष्टी करण्यात आली आहे. या सोन्याच्या साठ्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची दिशा बदलणार असून अर्थव्यवस्थेची गती वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या साठ्यामुळे देशाच्या सोन्याच्या साठ्यात मोठी वाढ होणार आहे. तसेच सोन्याची आयातही घटणार आहे. त्यामुळे संकटात असलेल्या अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची शक्यता आहे.

सोनभद्रमध्ये सापडलेल्या सोन्याच्या साठ्यामुळे देशाच्या सोन्याच्या साठ्यात पाटपटींनी वाढ होणार आहे. हिंदुस्थानात सध्या 626 टन सोन्याचा साठ असल्याचे वर्ल्ड गोल्ड काउंन्सिलच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. सोनभद्रमध्ये सापडलेला साठा या आकडेवारीपेक्षा पाचपटींनी जास्त आहे. या साठ्यामुळे हिंदुस्थान सर्वात जास्त सोन्याच्या साठा असलेल्या तीन देशांमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. या साठ्यामुळे देशातील सोन्याची आयात कमी होणार आहे. जगभरात हिंदुस्थान सर्वात जास्त सोन्याची आयात करणारा देश आहे. देशातील सराफा उद्योगासाठी सोन्याची आयात करण्यात येते. देशात सोन्याच्या दागिन्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. सरकारी आकडेवारीनुसार देशात दरवर्षी 800 ते 900 टन सोन्याची आयात होते. त्याची किंमत सुमारे 33 अब्ज डॉलर एवढी आहे.

सोन्याची आयात कमी होणार असल्याने व्यापारातील तोटाही कमी होणार आहे. 2019 मध्ये एप्रिल ते नोव्हेंबरमध्ये सोन्याची आयात घटल्याने व्यापारातील तोटाही कमी झाला होता. तो 106.84 अब्ज डॉलरवर आला होता. तर वर्षभरापूर्वी हा तोटा 133.74 अब्ज डॉलर एवढा होता. व्यापारातील तोटा कमी झाल्याने सरकारी तिजोरीवर पडणारा ताण कमी होणार आहे. त्यामुळे राजकोषीय घाटाही नियंत्रणात राहणार आहे. सलग तिसऱ्या वर्षी रोजकोषीय तोट्याचे उद्दीष्ट्य गाठण्यात मोदी सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे सोनभद्रचा सरकारला आधार मिळण्याची शक्यता आहे. सरकारचे उत्पन्न आणि खर्च यातील तफावत राजकोषीय तोट्यातून दिसून येते. त्यामुळे देशाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारला कर्ज काढावे लागते. त्यामुळे हा तोटा नियंत्रणात आल्यास देशावरील कर्जही कमी होणार आहे. सोनभद्रच्या साठ्याचा वापर करून देशाला जीडीपीमध्येही वाढ करता येणार आहे. त्यामुळे सध्याची आर्थिक परिस्थिती बघता, सोनभद्रचा सोन्याचा साठा अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या