परभणी – पोलीस कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थेचे तीन तेरा

548

परभणी जिल्ह्यातील एक पोलिस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु, या पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात इतर पोलीस कर्मचारी आल्याने त्यांचे विलगीकरणांचे आदेश पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी दिले आहेत.

कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे जिल्ह्यातील 38 पोलिसांचे ठिकठिकाणी विलगीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी 18 पोलीस परभणीच्या एका मंगल कार्यालयात असून या पोलीस कर्मचाऱ्यांना कसलीच व्यवस्था करून देण्यात आली नाही, असा आरोप पोलिसांकडून केला जात आहे.

परभणी जिल्ह्यातील एक पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु, या पोलीस कर्मचाऱ्याच्या संपर्कात इतर पोलिस कर्मचारी आल्याने त्यांचे विलगीकरणांचे आदेश पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी दिले आहेत. असे एकूण 38 पोलिस अधिकारी, कर्मचारी आहेत. त्यातील 18 पोलीस कर्मचारी व अधिकारी परभणीतील अक्षदा मंगल कार्यालयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. सोमवार, 25 मे रोजी सकाळी या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना या मंगल कार्यालयातील खोल्यामध्ये ठेवण्यात आले आहे.

एका-एका खोलीत चार ते पाच कर्मचारी ठेवण्यात आले आहेत. या ठिकाणी शिक्षण विभागातील एक कर्मचारी देखरेखीसाठी ठेवण्यात आला आहे. परंतु, सोमवार सकाळपासून विलगीकरणात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही सुविधा देण्यात आली नाही, असा आरोप केला जात आहे. या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना साधी सॅनिटायझरीची व्यवस्थादेखील करून देण्यात आलेली नाही. हॅंडवॉशचा पत्ता नाही. तसेच त्यांना कालपासून जेवणदेखील देण्यात आले नाही, असे विलगीकरणात असलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

सहायक पोलीस अधीक्षकांनी केली पाहणी

हा प्रकार उघड झाल्यानंतर आज मंगळवारी सकाळी साडेसात वाजता या ठिकाणी भेट दिली. त्यांनी अक्षदा मंगल कार्यालयातपाण्याची व्यवस्था नसल्याने तक्रारी आल्यामुळे सहायक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व नवामोंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांनी या ठिकाणी स्वतः जाऊन विलगीकरणात आलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाण्याचे जार पोहचती केले.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या वतीने विलगीकरण केलेल्या लोकांसाठी दररोज जेवण व इतर सुविधा पुरविल्या जात आहेत. परंतु, सोमवारपासून विलगीकरणात गेलेल्या 18 पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना जेवण दिल्या गेले नाही, असा आरोप करत हे जेवण गेले तरी कुठे, असा प्रश्न या पोलिस कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

विलगीकरण करून 24 तासांचा कालावधी झालेला असतांनाही या पोलीस कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी किंवा नियमित तपासणीसाठी आरोग्य विभागाचा एकही अधिकारी, कर्मचारी या मंगल कार्यालयाकडे फिरकला नाही. यावरूनही आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट होत आहे.

आम्ही रात्रंदिवस या कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी रस्त्यावर उभे आहोत. परंतु, आमचे कर्मचारी जेव्हा विलगीकरणात जातात तेव्हा त्यांच्याकडे कुणीच लक्ष देत नाही, ही निंदनीय बाब आहे. आपण वरिष्ठांपर्यंत ही बाब पोचविणार आहोत, अशी माहिती सहायक पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या