अकोल्यातल्या तरुणीची दिल्लीत आत्महत्या, चिठ्ठी लिहून सांगितले कारण

दिल्लीत एका 26 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली आहे. नैराश्यातून या तरुणीने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. ही तरुणी मुळची अकोला जिल्ह्याची रहिवासी असून दिल्लीत ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणीने चिठ्ठी लिहिली आहे.

अंजली असे या तरुणीचे नाव होते. अंजली मुळची अकोला जिल्ह्याची रहिवासी होती. कलेक्टर बनण्याचं स्वप्न पाहून अंजली दिल्लीत स्पर्धा परीक्षेच्या तयारीसीठी आली होती. दिल्लीच्या जुन्या राजेंद्र नगरमध्ये भाड्याच्या खोलीत अंजली रहायची आणि अभ्यास करायची. मृत्यूपूर्वी अंजलीने चिठ्ठी लिहिली आहे. यात तिने आई वडिलांची माफी मागितली आहे. अंजलीने म्हटले आहे की आई बाबा मला माफ करा, मी आयुष्याला खुप कंटाळली आहे, माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त अडचणीच आहेत. कुठेही शांतता नाही, या सर्वांमधून मी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पण मला यश मिळाले नाही. ”

अंजलीची मैत्रीण श्वेताने दिलेल्या माहितीनुसार तिने तीन वेळा UPSC ची परीक्षा दिली होती. पण तीनहीवेळा तिला अपयश आले. गेल्या काही महिन्यात इथल्या घरांचे भाडे वाढले होते त्यामुळेही त्रस्त होती असेही श्वेताने म्हटले आहे.

अंजलीने आपल्या चिठ्ठीत यावरही भाष्य केले आहे. भाड्याची घरं आणि हॉस्टेलची भाडं कमी झाले पाहिजे, इथले लोक फक्त लुटायला बसले आहेत, विद्यार्थ्यांना हे परवडत नाही असे अंजलीने म्हटले आहे.

अंजलीने आपल्या चिठ्ठीत सरकारलाही विनंती केली आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये अनेक ठिकाणी घोटाळा होत आहे. तो सरकारने कमी करावा आणि सरकारी नोकऱ्यांची संख्या वाढवावी, अनेक तरुण तरुणी नोकऱ्यांसाठी संघर्ष करत आहेत असेही अंजलीने म्हटले आहे.

अंजली ज्या घरात भाड्याने रहायची त्याचे महिन्याचे भाडे 15 हजार रुपये होते. पण घरमालकाने ते वाढवून 18 हजार रुपये केल्याचे तिची मैत्रीण श्वेताने सांगितले. दुसरीकडे तिच्या पालकांनी अंजलीला एका व्यक्तीकडून त्रास होत होता अशी तक्रार केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

काही दिवसांपूर्वी स्पर्धा परिक्षेच्या क्लासमध्ये पाणी भरून तिघांचा मृत्यू झाला होता. तेव्हाच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.