
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीमधील घटक पक्षांना जागावाटपात सन्मानाचे स्थान देणार असे सांगितले होते; परंतु भाजपने आमच्या स्वाभिमानावर आघात करत आम्हाला धोका दिला, असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज केला.
महायुतीच्या जागावाटपात आरपीआयला जागा न दिल्याने रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले, जागावाटपात रिपाइंला 14-15 जागा सुटतील असे आम्हाला वाटले होते. 2012 मध्ये शिवसेना-भाजपची युती असताना आमच्या पक्षाला 24 जागा मिळाल्या होत्या. त्याप्रमाणे यंदाही आम्हाला जागा मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र, भाजपकडून आम्हाला धोका देण्यात आल्याने आम्ही मुंबईत युती तोडली आहे. मुंबईत आम्ही स्वतंत्रपणे 39 उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला असून त्यांना एबी फॉर्मही दिले असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, अर्ज मागे घेण्यापर्यंत आमच्या पक्षासाठी काही जागा सोडण्याचा निर्णय महायुतीने घ्यावा, अन्यथा आम्ही उमेदवारी अर्ज भरलेल्या ठिकाणी निवडणूक लढणार असल्याचा इशाराही आठवले यांनी महायुतीला दिला.
भाजपला ताकद दाखवणार
कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी मुंबईत आम्ही 39 ठिकाणी निवडणूक लढणार असल्याची घोषणा आठवले यांनी केली. महायुतीने यावर तोडगा काढला नाही तर या निवडणुकीत आमची ताकद दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी उमेदवारांची यादीही जाहीर केली.




























































