उरण वीज प्रकल्पाचा गॅस पुरवठा सुरू

356


ओएनजीसीच्या उरण येथील गॅस प्रकल्पात लागलेल्या आगीमुळे गेल्या दहा दिवसांपासून ठप्प असलेला महानिर्मितीच्या उरण वीज प्रकल्पाचा गॅस पुरवठा आजपासून सुरू झाला आहे. त्यामुळे एका वीज संचातून 115 मेगावॅट एवढी वीजनिर्मिती सुरू झाली आहे. मात्र गेल्या दहा दिवसांपासून गॅसअभावी येथील वीजनिर्मिती ठप्प राहिल्याने महानिर्मितीला सुमारे 20 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

महानिर्मितीचा उरण येथे गॅसवर चालणारा 672 मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प आहे. हा वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी दररोज सुमारे 3.35 दशलक्ष घनमीटर गॅसची आवश्यकता आहे. पण अपुऱया गॅसमुळे वर्षानुवर्षे हा वीज प्रकल्प अर्ध्या क्षमतेवर म्हणजे 250 मेगावॅट एवढ्या कमी क्षमतेवर चालत आहे. त्यातच 3 सप्टेंबर रोजी ओएनजीसीच्या प्रकल्पात लागलेल्या आगीमुळे वीज प्रकल्पाला होणारा गॅस पुरवठा ठप्प झाला होता, तो आज काही अंशी पूर्ववत झाला आहे. दरम्यान, गॅसपुरवठा बंद झाल्याने 250 मेगावॅट एवढी होणारी वीज निर्मिती बंद पडली होती. अडीचशे मेगावॅटप्रमाणे 24 तासांत तब्बल 60 लाख विजेची निर्मिती होते. तसेच येथे तयार होणाऱ्या प्रतियुनिट विजेचा दर तीन रुपये एवढा आहे. गेली दहा दिवस वीजनिर्मिती बंद राहिल्याने महानिर्मितीला तब्बल 20 कोटी रुपये एवढय़ा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

वीजनिर्मितीवर परिणाम होणार

ओएनजीसीकडून गॅस पुरवठा सुरू झाला असला तरी तो कोणत्या गुणवत्तेचा आहे, वजनाने जड असेल तर त्याचा वीज निर्मितीवर परिणाम होणार आहे. त्याचाबरोबर गॅस पुरवठा सुरू झाला असला तरी तो पूर्ण क्षमतेने कधीपासून मिळणार याबाबतही कोणतीच ठोस माहिती नाही. त्यामुळे जेवढ्या प्रमाणात गॅस येईल तेवढीच वीजनिर्मिती होऊ शकणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या