उरण महावितरणचा वीज चोरांवर कारवाईचा धडाका

सामना प्रतिनिधी, न्हावाशेवा

उरण महावितरणने वीज चोरांवर कडक कारवाईचे संकेत दिले असून गेल्या काही दिवसात जवळ जवळ 10 वीज चोरांवर कारवाई केली असून या वीज चोरांमध्ये एक जिल्हा परिषद सदस्य असल्याने खळबळ माजली आहे. वीज गळती आणि वीज चोरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गेल्या काही दिवसांत तालुक्यात भरारी पथकातर्फे धाडी टाकण्यात येत असल्याने वीज चोरांचे धाबे दणाणले आहेत.

उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात वीज चोरी केली जाते. ही वीज चोरी रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात येणार आहे. महावितरणने कारवाई केलेल्या 10 वीज चोरांकडून तब्बल 4 लाख 63 हजार 490 रूपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. या ग्राहकांनी सुमारे 30 हजार 936 इतक्या युनिटची चोरी केल्याचे उघड झाले आहे. ही विज चोरी करताना ग्राहकांनी अनेक क्लृप्त्या लढविल्याचे पुढे आले आहे. काही ग्राहकांनी वीज मिटरच्या सर्किटमध्ये फेरफार केला होता, काहीनी सर्व्हिस वायरला टॅपिंग केले होते तर काहीनी मिटरमध्ये लुपिंग करून वीज वापरत होते. या प्रकारामुळे विजेचा वापर जास्त होत असला तरी मिटरची रिडींग कमी पडत असल्याने वीज गळती जास्त येत होती.

हरिदास चोंढे यांनी उरण महावितरणची सूत्रे हाती घेतली आहेत तेव्हा पासून महावितरणच्या कारभारात सुधारणा होताना दिसत असून वीज जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यापुढे देखील वीज चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगून वीज चोरी रोखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.