
उरणच्या ओएनजीसी प्रकल्पातील मिनाज प्लाण्ट परिसरातील क्रूड ऑइलच्या डेपोला आज सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत दोन कामगार होरपळले. आग इतकी भीषण होती की, दहा किमी परिसरातून धुराचे लोट दिसत होते. आसमंतात पसरलेला धूर आणि उग्र वासामुळे नागरिक भीतीने सैरावैरा पळत असल्याचे चित्र काही ठिकाणी पहायला मिळाले. तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
ओएनजीसी प्लाण्टमध्ये कोजनरेशन प्लाण्टसमोरच स्लजकेचर फिल्टर प्लाण्ट आहे. या प्लाण्टच्या शेजारी मोकळी जागा आहे. या जागेत फिल्टर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात क्रूड ऑइल साठवून ठेवले जाते. या क्रूड ऑइलच्या साठ्यालाच संध्याकाळी साडेपाच वाजता भीषण आग लागली. अत्यंत ज्वलनशील असलेल्या तेलामुळे आगीचा मोठा भडका उडाला. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट क्षणात आसमंतात मिसळले. धुरामुळे दहा किमीचा परिसर झाकाळून गेला. प्रचंड धूर आणि उग्र वासामुळे नागरिकांना श्वास घेताना त्रास होत होता. ओएनजीसीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या शर्थीने तासाभराने आग आटोक्यात आणली. यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. जखमी दोन कामगारांना उपचारासाठी उरण येथील खासगी पालवी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
– आगीची झळ नागाव, म्हातवली परिसराला बसली. धूर आणि उग्र वास यामुळे वायू गळतीच्या भीतीने शेकडो नागरिक दोन तास घराबाहेर होते.
– सुट्टी झाल्याने मोठा अनर्थ टळला
– पाच वाजता कामगारांची सुट्टी झाली होती. त्यामुळे प्लाण्टमध्ये कामगारांची वर्दळ कमी होती. मात्र वेळीच आग आटोक्यात आणण्यात आली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी अपघाताच्या ठिकाणाहून काही अंतरावर वेिंल्डगची कामे सुरू होती. यातील एखाद्या ठिणगीने आग लागल्याचा अंदाज आहे.



























































