ती आली…ती हरली…ती गेली, उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसला रामराम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
urmila-matondkar

काँग्रेस पक्षातील राजीनामा सत्र संपता संपत नाही. आता पाच महिन्यांपूर्वी दाखल झालेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने पक्षातून राजीनामा दिला आहे. अभिनयातून राजकारणात आलेल्या उर्मिलाने कांग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे. राजकीय आणि सामाजिक जाणीवेतून समाजासाठी मोठे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी मी राजकारणात आले होते,मात्र काँग्रेसच्या अंतर्गत गबाजीमुळे मला हे शक्य नाही असे उर्मिलाने राजीनामा देताना म्हटले आहे.

उर्मिला मातोंडकर हिने मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांना पत्र लिहिले होते ,ज्यामध्ये तिने तिच्या अडचणी मांडल्या होत्या. पक्षातील या अडचणी दूर करण्याऐवजी काँग्रेसमधल्या एका गटाने उर्मिलाचे ते पत्र ‘लीक’ केले होते. हा माझ्यासोबत करण्यात आलेला विश्वासघात होता असं उर्मिलाचं म्हणणं आहे.

उर्मिलाने देवरा यांना लिहिलेल्या पत्रात लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवाला कोण-कोण जबाबदार आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. ‘माझ्याविरोधात कारस्थाने करणाऱ्यांविरोधात काहीच कारवाई करण्यात आली नाही’ असा आरोप उर्मिलाने केला आहे.  उर्मिलाने आरोप केला आहे की तिच्याविरोधात काम करणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना नवीन पदे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

लोकसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाने उर्मिला मातोंडकरला उत्तर मुंबई मतदारसंघातून तिकीट दिले होते. उर्मिलाचा भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्यापुढे निभाव लागला नाही आणि त्यांचा दारूण पराभव झाला. त्यानंतर पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून आपण राजीनामा देत आहोत असे उर्मिलाने आपल्या पत्रात म्हटले आहे.