
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी रात्री चीनवर 100 टक्के टॅरिफ लादत असल्याची घोषणा केली. चीननेही अमेरिकेला सडतोड उत्तर देत आम्ही हरणार नाही, लढणार असे प्रत्युत्तर दिले. त्यामुळे या दोन देशातील व्यापार युद्ध चांगलेच पेटण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींची परिणाम शेअर बाजारावरही झाला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली. त्याचप्रमाणे आशियाई शेअर बाजारासह जागतिक शेअर बाजारही कोसळले आहेत.
आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी शेअर बाजार घसरणीने सुरू झाला. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर १००% टॅरिफ लावण्याची घोषणेचा परिणाम आशियाई बाजारांसह भारतीय शेअर बाजारातही दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सुरू होताच काही मिनिटांतच ४०० पेक्षा जास्त अंकांनी घसरला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांकही सुमारे १२० अंकांनी घसरला. सुरुवातीच्या व्यवहारात टाटा मोटर्सपासून गो-डिजिटपर्यंतचे शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली.
ट्रम्प यांच्या घोषणेमुळे परदेशातून निराशाजनक संकेत मिळत होते. त्यामुळे सोमवारी शेअर बाजाराची सुरुवात मंदीने होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. ती शक्यता खरी ठरली आहे. सोमवारी आशियाई बाजारात व्यवहार सुरू झाले तेव्हा जपानपासून हाँगकाँग आणि दक्षिण कोरियापर्यंतचे बाजार कोसळले. सुरुवातीच्या व्यवहारात, निक्केई ४९१.६४ अंकांनी वाढून ४८,०८८.८० वर, हाँगकाँगचा हँग सेंग ५३४.३३ अंकांनी घसरून २५,७५६ वर आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी ३८.३१ अंकांनी घसरून ३,५७२.२९ वर पोहोचला. इतर आशियाई बाजारांमध्येही मोठी घसरण दिसून आली.
देशाच्या शेअर बाजारावरही याचा परिणाम दिसून आला. सोमवारी शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच मुंबई आणि राष्ट्रीय दोन्ही निर्देशांक मोठ्या प्रमाणात घसरले. बीएसई सेन्सेक्स रेड झोनमध्ये उघडला, त्याच्या मागील बंद ८२,५००.८२ वरून घसरला आणि उघडल्यानंतर तो ८२,०४९ वर घसरला. त्याचप्रमाणे, एनएसई निफ्टीदेखील रेड झोनमध्ये उघडला. निर्देशांक २५,१७७ वर उघडला, जो त्याच्या मागील बंद २५,२८५.३५ वरून घसरला आणि नंतर २५,१५२ वर घसरला. त्यानंतर बाजाराने सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात परत घसरण झाली. जागितक घडामोडींमुळे पुढील काही दिवस बाजारात अस्थिरता असण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.