Us Israel Iran War – इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान रशियाकडून तुंगुस्का संरक्षण प्रणाली खरेदी करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हंदुस्थान रशियाकडून तुंगुस्का विमानविरोधी आणि क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करणार आहे. यासाठी हिंदुस्थानने रशियाच्या रोसोबोरॉन एक्सपोर्टसोबत 445 कोटी रुपयांचा करार केला आहे. हिंदुस्थानी लष्करासाठी युद्धभूमीवर रणगाडे आणि यांत्रिक वाहनांना हवाई संरक्षण देण्यासाठी ही तुंगुस्का प्रणाली खरेदी करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्रालयाने तुंगुस्का हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची खरेदी आणि पी8आय लांब पल्ल्याच्या सागरी टेहळणी विमानाची तपासणी यासाठी 858 कोटी रुपयांच्या करारांवर स्वाक्षरी केली आहे.

संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी 27 मार्च 2026 रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य भवन-2 येथे रशियाच्या जेएससी रोसोबोरॉन एक्सपोर्टसोबत या करारावर स्वाक्षरी केली. ही अत्याधुनिक क्षेपणास्त्रे विमाने, ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रांसह देशाची बहुस्तरीय हवाई संरक्षण क्षमता वाढवतील. हा करार हिंदुस्थान-रशिया सामरिक संरक्षण भागीदारीला अधिक मजबूत करेल.

तुंगुस्का ही रणगाड्यासारखी दिसणारी विमानविरोधी आणि क्षेपणास्त्र प्रणाली असून ती शत्रूची विमाने, हेलिकॉप्टर, ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रेही पाडू शकते. रशियन सैन्याने युक्रेनविरुद्ध याचा वापर केला आहे.

पी-8आय विमानासाठी 413 कोटी रुपयांचा करार

संरक्षण मंत्रालयाने हिंदुस्थानी नौदलासाठी पी-8आय या लांब पल्ल्याच्या सागरी टेहळणी विमानांच्या डेपो-स्तरीय तपासणीसाठी बोईंग इंडिया डिफेन्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत 413 कोटी रुपयांचा करार केला आहे. यामध्ये स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आला आहे. यामुळे पी-8आय विमानांच्या ताफ्याची देखभाल आणि दुरुस्ती देशांतर्गतच करणे शक्य होते.