
अमेरिकेत अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणारा जेफ्री एपस्टीन याच्याशी संबंधित दस्तावेजातील काही फाईल्स हटविण्यात आल्या आहेत. यावरून देशभरात प्रचंड टीका झाल्यानंतर अमेरिकेच्या न्याय विभागाने या फाईल्स पुन्हा अपलोड केल्या आहेत. न्याय विभागाकडून ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळण्यात येत आहे त्यावर एपस्टीन पीडित आणि अमेरिकेतील लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या गुह्यांशी संबंधित सर्व पुरावे जगासमोर आले पाहिजेत, अशी मागणी पीडितांकडून करण्यात येत आहे.
न्याय विभागाने एपस्टीन फाईल्सचा काही भाग अपलोड केल्यानंतर दुसऱया दिवशी त्यातील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित 16 फाईल्स हटविल्या होत्या. त्यात ट्रम्प यांच्यासह त्यांच्या पत्नीचीही काही छायाचित्रे होती. कोणतेही कारण न देता फाईल्स हटविल्यावरून न्याय विभागावर टीकेची झोड उठली. सरकार डोनाल्ड ट्रम्प यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या खासदारांनी केला होता.
…म्हणून हटविल्या त्या फाईल्स
फाईल्स हटविण्यामागे न्याय विभागाने पारदर्शकतेचे कारण दिले आहे. पीडितांची ओळख उघड होऊ नये यासाठी त्या फाईल्स हटविल्या आहेत. काही पीडितांनी या फाईल्सवर आक्षेप घेतला होता, मात्र तपासणीनंतर आक्षेपार्ह काहीही न आढळल्यामुळे सर्व फाईल्स पुन्हा अपलोड करण्यात आल्याचे न्याय विभागाने स्पष्ट केले आहे.
पीडितांमध्ये भीतीचे वातावरण
न्याय विभागाने ज्या पद्धतीने एपस्टीन फाईल्स प्रसिद्ध केल्या आहेत, त्यावरून अनेक पीडितांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मरिना लासेर्डा या पीडितेने स्वतःहून समोर येत सांगितले की, वयाच्या 14व्या वर्षी तिच्यावर अत्याचार झाले. न्याय विभागाने पूर्ण फाईल्स अपलोड केलेल्या नाहीत. त्यात आपल्याबद्दल काय आणि कशी माहिती उघड केली जाते, याबाबत अनेक पीडित भयभीत आहेत. काही पीडितांचे म्हणणे आहे की, न्याय विभाग काहीही संबंध नसलेल्या फाईल्स अपलोड करू शकतो, त्यांनी एपस्टीन फाईल्स कायद्याचा भंग केल्याचा आरोपही काहींनी केला आहे.


























































