बोपन्ना -सुत्जियादी उपांत्यपूर्व फेरीत

हिंदुस्थानचा स्टार टेनिसपटू रोहन बोपन्ना व त्याचा इंडोनेशियाची साथीदार अल्दिला सुत्जियादी या जोडीने अमेरिका ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. आता आगामी लढतीत बोपन्ना-सुत्जियादी या आठव्या मानांकित जोडीपुढे मॅथ्यू एबडेन व बारबोरा क्रेजिकोवा या चतुर्थ मानांकित जोडीचे आव्हान असेल.

बोपन्ना-सुत्जियादी जोडीने दुसऱ्या फेरीत ऑस्ट्रेलियाचा जॉन पीयर्स व झेक प्रजासत्ताकची कतरीना सिनियाकोवा या जोडीचा 0-6, 7-6(5), 10-7 असा पराभव करीत आगेपूच केली. ही चुरशीची लढत एक तास 13 मिनिटांपर्यंत रंगली. बोपन्ना-सुत्जियादी जोडीने पहिल्या सेटमध्ये सपशेल शरणागती पत्करली होती, मात्र त्यानंतर टायब्रेकपर्यंत ताणलेला दुसरा सेट जिंकून त्यांनी लढतीत पुनरागमन केले. त्यानंतर सेटही जिंकून विजयावर शिक्कामोर्तब केला. रोहन बोपन्नाने मॅथ्यू एबडेन साथीत पुरुष दुहेरीचीही तिसरी फेरी गाठली आहे.

सिनरची घोडदौड

अक्वल मानांकित इटलीच्या यानिक सिनरने ऑस्ट्रेलियाच्या ख्रिस्तोफर ओ’कोनेलचा 6-1, 6-4, 6-2 असा सरळ सेटमध्ये धुक्वा उडवित चौथी फेरी गाठली. नोवाक जोकोविच व कार्लेस अल्काराज या दिग्गज खेळाडूंचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्याने यानिक सिनरला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे, मात्र 2021 चा चॅम्पियन डॅनिल मेदवेदेव यानेही आगेकूच केलेली आहे.