अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा, हिंदुस्थानच्या सुमीतने फेडररला झुंजवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sumit-nagal

हिंदुस्थानच्या टेनिसवर्तुळात नवा स्टार उदयाला आला आहे. हरयाणाचा 22 वर्षीय सुमीत नागल हे त्याचे नाव. जागतिक क्रमवारीत 190व्या स्थानावर असलेल्या या पठ्ठय़ाने सर्वाधिक ग्रॅण्डस्लॅम जिंकणाऱया रॉजर फेडररला अमेरिकन टेनिस ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत कडवी झुंज दिली. त्याने पहिला सेट 6-4 अशा फरकाने खिशात घालत रॉजर फेडररला झोपेतून जागे केले आणि जगभरातील टेनिसप्रेमींना आपल्याकडे आकर्षित केले. यानंतरच्या तिन्ही सेटमध्ये रॉजर फेडररने बाजी मारत लढत जिंकली खरी पण सुमीत नागलने आपल्या लढवय्या वृत्तीने हिंदुस्थानातील टेनिस या खेळामधील भविष्य उज्ज्वल असल्याचे दाखवून दिले.

सुमीत नागल हा पहिल्यांदाच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत खेळत होता. त्यामुळे साहजिकच रॉजर फेडररचे पारडे जड होते. मात्र पहिल्या सेटमध्ये सुमीत नागलने 6-4 अशा फरकाने विजय मिळवत स्वित्झर्लंडच्या दिग्गज खेळाडूला ‘440 व्होल्ट’चा झटका दिला. त्यानंतर रॉजर फेडररने पुढील तीनही सेटमध्ये प्रतिमेला साजेशी कामगिरी केली. त्याने हे सेट 6-1, 6-2, 6-4 अशा फरकाने जिंकत आगेकूच केली.

टेनिसमधील भविष्य उज्ज्वल

सुमीतला माहिती आहे की टेनिस कोर्टवर तो काय कमाल करू शकतो. त्यामुळे त्याचे टेनिसमधील भविष्य उज्वल आहे असे मला मनापासून वाटते. टेनिस या खेळात फार मोठे चमत्कार किंवा धक्कादायक प्रकार घडत नाहीत. या खेळात सातत्याला महत्व आहे. त्याने आजच्या सामन्यात आप्रतिम खेळ करून दाखवला, असे कौतुक रॉजर फेडररने यावेळी सुमीतचे केले.