अमेरिकी सैनिकाचे इराणमधील 48 तास; शत्रूपासून लपण्यासाठी 70 हजार फूट उंचीवर चढाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणने अमेरिकेचे एफ-15 हे विमान पाडल्यानंतर बेपत्ता झालेल्या एका सैनिकाची अमेरिकी लष्कराने तब्बल दोन दिवसांनी सुटका केली. या काळात त्याला कोणत्या दिव्याला सामोरे जावे लागले. इराणी सैनिकांपासून लपण्यासाठी त्याने 70 हजार फूट उंच डोंगररांगांवर चढाई कशी केली, याची थरारक माहिती समोर आली आहे.

इराण-अमेरिकेमध्ये हवाई धुमश्चक्री सुरू असताना 3 एप्रिल रोजी इराणने अमेरिकेला धक्का दिला. अमेरिकेचे एफ-15 हे अत्याधुनिक विमान पाडले. विमान कोसळल्यानंतर त्यातील पायलटला शोधण्यात अमेरिकेला यश आले. मात्र, दुसऱया सैनिकाचा शोध लागला नव्हता. हा सैनिक हाती लागावा म्हणून इराणने तात्काळ मोहीम हाती घेतली. त्याला पकडून देण्यासाठी मदत करणाऱयास 60 हजार डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले. इराणी नागरिकांना शोधमोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. मात्र, कर्नल दर्जाचा हा सैनिक इराणच्या तावडीतून सुखरूप वाचला.

बेपत्ता कर्नल शत्रूच्या प्रदेशात तब्बल 48 तास होता. इराणी सैन्यापासून वाचण्यासाठी त्याने डोंगररांगांतील फटींचा आश्रय घेतला. तिथून तो पुढे सरकत राहिला. त्याच्याकडे एक पिस्तूल, संवादासाठी केवळ एक उपकरण आणि एक ट्रेकिंग बीकन होते. त्या जोरावर त्याने शत्रूला चकमा दिला. सीआयएला देखील त्याचा ठावठिकाणा सापडत नव्हता. शेवटी काही अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून सीआयएने त्याला शोधून काढले. नंतर त्याची सुटका करण्यात आली. अमेरिकेच्या लष्करी इतिहासातील ही सर्वात धाडसी बचाव मोहीम होती, असे ट्रम्प यांनी सांगितले.

अमेरिकेची बचाव मोहीम उधळली; इराणचा दावा

डोनाल्ड ट्रम्प बचाव मोहीम यशस्वी झाल्याचे सांगत असताना इराणने मात्र वेगळा दावा केला. ‘अमेरिकेचे कथित रेस्क्यू ऑपरेशन आम्ही उधळून लावले. अमेरिकेची ही मोहीम म्हणजे धूळफेक होती. त्यासाठी दक्षिण इस्फहानमधील निर्जन विमानतळाचा वापर करण्यात आला. आमच्या लष्कराने अमेरिकेची दोन सी-130 विमाने आणि दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स उद्ध्वस्त केली असून पाच सैनिकही मारले,’ असे इराणी लष्कराचे प्रवत्ते इब्राहिम झुल्पघारी यांनी सांगितले.