इराणने अमेरिकेचा ड्रोन उडवला; युद्धासाठी तयार असल्याचा दावा

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

अमेरिका आणि इराणधील तणाव वाढला आहे. त्यातच इराणने अमेरिकेचा शक्तीशाली ड्रोन उडवल्याने युद्धाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ड्रोन उडवल्यावर दोन्ही देशांनी एकमेकांवर आरोप करणारे दावे केले आहेत. आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्रात उडणाऱ्या सुमारे 18 कोटी डॉलरचा आपला हेरगिरी करणारा ड्रोन इराणने उडवला असल्याचे अमेरिकेने सांगितले. त्यानंतर हा ड्रोन इराणच्या हवाई क्षेत्रात होता, त्यामुळे तो उडवल्याचे इराणने म्हटले आहे. इराणची सीमा ओलांडणाऱ्या कोणत्याही शत्रूची गय करणार नसल्याचे इराणने स्पष्ट करत आपला युद्धाला तयार असल्याचे सांगत अमेरिकेला आव्हान दिले आहे. त्यामुळे दोन्ही देशातील संघर्ष पेटल्यास युद्धाची किंवा अणुयुद्धाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इराणच्या हवाई क्षेत्रातून ड्रोन उडत असल्याचा दावा अमेरिकेने फेटाळला आहे. हा ड्रोन आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्रात असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. हा ड्रोन आमच्या सीमेत आल्याने तो उडवल्याचे इराणने स्पष्ट केले आहे. इराणची सीमा पार करणाऱ्या शत्रूला धडा शिकवला जाईल, असेही ते म्हणाले. आम्ही युद्धाला तयार असल्याचे सांगत कोणत्याही शत्रूची गय केली जाणार नाही, असे ते म्हणाले. अमरिकेच्या आरक्यू ४ ग्लोबल हॉक हा ड्रोन इराणने दक्षिण किनारपट्टीच्या हॉरमूजगन भागात उडवला आहे. हा अमेरिकेचा शक्तीशाली ड्रोन असून 56 हजार फूटांच्या उंचीवरून उडण्याची त्याची क्षमता आहे. तो सलग 30 तास उडू शकतो. हा ड्रोन उडवण्यासाठी सक्षम रडार गायडेड क्षेपणास्त्राची गरज असते. अशा प्रकारचा अमेरिकेचा ड्रोन पहिल्यांदाच पाडण्यात आला आहे. शक्तीशाली ड्रोन इराणने उडवल्याने अमेरिका संतापली असून दोन्ही देशातील संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी तेल जहाजांवर इराणनेच हल्ले केले होते असा आरोप अमेरिकेने केला आहे. मात्र, इराणने तेल जहावर हल्ले केल्याचे अमान्य केले आहे. अमेरिकेने इराणवर निर्बंध लादल्यानंतर दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. आता इराणने अमेरिकेचा शक्तीशाली ड्रोन पाडल्याने युद्धाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.