अदानीविरोधी खटल्यास विलंब, अमेरिकेने दाखवले मोदी सरकारकडे बोट

लाचखोरी व फसवणूक प्रकरणी अदानी समूहावर अमेरिकेत सुरू असलेल्या खटल्याला विलंब होत असल्याबद्दल अमेरिकन सेक्युरिटी अँड एक्स्चेंज कमिशनने (सेक) मोदी सरकारला दोष दिला आहे. आम्ही हिंदुस्थान सरकारशी संपर्क साधला आहे. मात्र, हिंदुस्थान सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाकडून अद्याप गौतम अदानी व इतरांना समन्स पाठवण्यात आलेले नाही, अशी माहिती सेकने न्यूयॉर्प न्यायालयात दिली आहे.

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी, सागर अदानी व इतरांवर अमेरिकेत 265 दशलक्ष डॉलर्सची लाचखोरी, फसवणूक व कटकारस्थानांचे आरोप ठेवण्यात आले आहेत. या प्रकरणी न्यायालयीन कारवाई देखील सुरू झाली आहे. मात्र, अदानींना दोषी ठरविल्यानंतर हा खटला पुढे सरकलेला नाही. यावर न्यायालयात खुलासा करताना ‘सेक’ने आज मोदी सरकारकडे बोट दाखवले. हेग सर्व्हिस कन्व्हेन्शनच्या नियमानुसार, हिंदुस्थानकडून या प्रकरणी सहकार्य मिळायला हवे. आम्ही फेब्रुवारीपासून हिंदुस्थानच्या विधी व न्याय मंत्रालयाच्या संपर्कात आहे, परंतु अदानींना समन्स बजावण्याबाबत त्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही, असे सेकने न्यायालयात सांगितले.