इराणवरील युद्धाच्या पहिल्या 48 तासांत अमेरिकेने वापरली 51 हजार 400 कोटींची शस्त्रे, ट्रम्प वेगळे बजेट आणण्याच्या तयारीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणविरोधातील युद्धाच्या पहिल्या 48 तासांत अमेरिकेने सुमारे 5.6 अब्ज डॉलर्स (अंदाजे 51 हजार 400 कोटी रुपय़े) किमतीची शस्त्रे वापरल्याचे समोर आले आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या अहवालानुसार, या रकमेत केवळ युद्धाच्या सुरुवातीच्या टप्प्यात वापरण्यात आलेल्या दारुगोळ्याचा खर्च समाविष्ट आहे. सैन्य, विमाने किंवा नौदलाच्या तैनातीसारख्या इतर खर्चाचा यात समावेश नाही.

या अंदाजामुळे अमेरिकेतील राजकीय वर्तुळात चिंता व्यक्त केली जात आहे. काही काँग्रेस सदस्यांच्या मते, इराणविरोधातील युद्धामुळे अमेरिकेची लष्करी तयारी झपाट्याने कमी होत आहे. तसेच हे युद्ध किती काळ चालू ठेवता येईल याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत, कारण संघर्षाचा परिणाम दोन्ही बाजूंनी अपेक्षेपेक्षा वेगळा दिसत आहे.

मात्र ट्रम्प प्रशासनाने या चिंतेला फेटाळून लावले आहे. संरक्षण विभागाचे मुख्य प्रवक्ते सीन पार्नेल यांनी सांगितले की, “राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या आदेशानुसार कोणतेही मिशन पूर्ण करण्यासाठी संरक्षण विभागाकडे आवश्यक असलेली सर्व साधने उपलब्ध आहेत.”

28 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या संघर्षानंतर अमेरिकन सैन्याने मोठ्या प्रमाणावर महागडी शस्त्रे वापरली आहेत. यात प्रगत हवाई संरक्षण इंटरसेप्टर तसेच टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. मध्यपूर्वेतील लष्करी कारवायांवर देखरेख करणाऱ्या अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या माहितीनुसार, इराणमध्ये आतापर्यंत 5,000 हून अधिक लक्ष्यांवर हल्ले करण्यात आले असून त्यासाठी 2,000 पेक्षा अधिक दारुगोळा वापरण्यात आला आहे.

दरम्यान, या मोहिमेला चालना देण्यासाठी ट्रम्प प्रशासन या आठवड्यात काँग्रेससमोर पूरक संरक्षण अर्थसंकल्प मांडण्याची तयारी करत आहे. या प्रस्तावित निधीची रक्कम अब्जावधी डॉलर्सपर्यंत असू शकते. मात्र या प्रस्तावाला डेमोक्रॅटिक पक्षातील अनेक नेत्यांचा विरोध होण्याची शक्यता आहे. ट्रम्प प्रशासनाने इराणविरोधातील लष्करी कारवाई आणखी वाढवू नये, अशी भूमिका काही डेमोक्रॅटिक नेत्यांनी घेतली आहे.