
हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये कोणत्याही क्षणी तणाव वाढू शकतो याची मला प्रचंड काळजी आहे. आम्ही हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील आमच्या जवळच्या मित्रांच्या संपर्कात आहोत, असे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर द्या, परंतु संघर्ष नको, असे आवाहनही त्यांनी दोन्ही देशांना केले आहे.
आम्हाला आशा आहे की हिंदुस्थान पहलगाम दहशतवादी हल्ल्याला अशा प्रकारे प्रत्युत्तर देईल की ज्यामुळे व्यापक प्रादेशिक संघर्ष निर्माण होणार नाही. तसेच पाकिस्तान त्यांच्या हद्दीत कधी कधी सक्रिय होत असलेल्या दहशतवाद्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी हिंदुस्थानला सहकार्य करेल, असेही व्हान्स यांनी नमूद केले आहे. फॉक्स न्यूज चॅनेलवरील एका मुलाखतीत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
इंग्लंडही म्हणतेय तणाव नको
पहलगाम हल्ल्यावरून दोन्ही देशांमध्ये तणाव वाढू देऊ नका असा सल्ला इंग्लंडनेही हिंदुस्थानला दिला आहे. ब्रिटनच्या संसदेत कश्मीरमधील वाढत्या तणावावर चर्चा झाली. यावेळी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला.