आईने जे शिकवलेय, तेच कर… कीप इट अप! कमला हॅरीस यांना दिल्लीतील मामाचा सल्ला

संपूर्ण जगभरातून कौतुकाचा वर्षाव सुरू असतानाच मामाच्या तोंडून आपुलकीचे शब्द ऐकताच हिंदुस्थानी वंशाच्या कमला हॅरीस यांच्या आनंदापुढे आकाश ठेंगणे झाले. “आईने जे शिकवलेय, तेच कर… तू आतापर्यंत चांगलेच काम केलेस. कीप ईट अप…’’ बुधवारी रात्री अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर कमला यांना काही क्षणांतच दिल्लीतील मामा गोपालन भालचंद्रन यांनी हा सल्ला दिला.

कोरोनाच्या निर्बंधामुळे भाचीच्या शपथविधी सोहळ्याला जाऊ शकलो नाही, अशी खंत भालचंद्रन यांनी व्यक्त केली. याच वेळी त्यांनी कमला यांना आईच्या शिकवणीची आठवण करून दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, आम्हाला तिचा अभिमान आहे. तिच्या आईलाही (श्यामला) तिचा अभिमान वाटला असता.

आईने जे शिकवलेय, तेच तिने करावे. मी तिला एवढेच सांगू शकतो, ती पुढील कार्यकाळात कदाचित अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवेल अन् जिंकेलही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच कमला यांचे बालपण आणि तरुणपणीचे फोटो सोशल मीडियात शेअर करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. भालचंद्रन हे इन्स्टिटय़ूट ऑफ डिफेन्स स्टडीज अॅण्ड अॅनालिसीस संस्थेत कार्यरत आहेत. ते कोरोनाची लस घेतल्यानंतर कमला यांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी अमेरिकेला जाणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या