अमेरिकेचा संभाव्य धोक्याचा इशारा; जगभरातील अनेक देशांकडून व्हेनेझुएलाला जाणारी उड्डाणे रद्द

अमेरिका-व्हेनेझुएला या दोन देशातील तणाव शिगेला पोहोचत आहे. या पार्श्वभूमीवर यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) ने व्हेनेझुएलावरून उड्डाण करताना संभाव्य धोकादायक परिस्थितीबाबत एअरलाइन्सना इशारा दिला. अमेरिकेच्या या इशाऱ्यानंतर जगभरातील अनेक देशांनी व्हेनेझुएलाला जाणारी उड्डाणे रद्द केली आहे. व्हेनेझुएला सरकारने नोबेल शांती पुरस्कार विजेत्या मारिया मचाडो यांना पुरस्कार स्वीकारण्यासाठी परदेशात गेल्यास फरार घोषित करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे अमेरिका आणि व्हेनेझुएलामधील तणाव अधिक वाढला आहे.

अमेरिकेच्या संभाव्य धोक्याच्या इशाऱ्यानंतर जगातील अनेक प्रमुख आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी व्हेनेझुएला जाणारी त्यांची उड्डाणे रद्द केली आहेत. व्हेनेझुएलामधील निकोलस मादुरो सरकार उलथवून टाकण्याचे वक्तव्य अमेरिकेने केले आहे. त्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. या परिस्थितीमुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. ब्राझीलचे गोल, कोलंबियाचे एव्हियान्का आणि टॅप एअर पोर्तुगाल यांनी शनिवारी व्हेनेझुएलाला जाणारी त्यांची नियोजित उड्डाणे रद्द केली.

व्हेनेझुएला-अमेरिका या दोन्ही देशांमधील युद्ध तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. चार वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की ट्रम्प प्रशासन येत्या काही दिवसांत व्हेनेझुएलावर कारवाईचा एक नवीन टप्पा सुरू करू शकते. या कारवाईची वेळ आणि व्याप्ती स्पष्ट नसली तरी, सूत्रांनी असे सूचित केले आहे की यबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे.

रविवारी प्रसिद्ध झालेल्या रॉयटर्सच्या अहवालात म्हटले आहे की, यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) ने व्हेनेझुएलावरून उड्डाण करताना संभाव्य धोकादायक परिस्थितीबद्दल एअरलाइन्सना इशारा दिल्यानंतर शनिवारी अनेक प्रमुख आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी व्हेनेझुएलाकडे जाणारी आणि येणारी उड्डाणे रद्द केली. तेव्हापासून विमान कंपन्या उड्डाणे रद्द करत आहेत. कोलंबियाच्या विमान वाहतूक प्राधिकरण, एरोनॉटिका सिव्हिलने म्हटले आहे की बिघडत्या सुरक्षा परिस्थिती आणि परिसरात वाढत्या लष्करी हालचालींमुळे मैक्वेटीया क्षेत्रात उड्डाण करताना संभाव्य धोके आहेत. TAP एअर पोर्तुगालने पुढील मंगळवारी ओरो येथून त्यांची उड्डाणे रद्द करण्याची पुष्टी देखील केली आहे.

अमेरिकन विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या अलर्टनंतर एअरलाइनने हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की व्हेनेझुएलाच्या हवाई क्षेत्रात सुरक्षिततेची हमी नाही. स्पेनच्या इबेरिया एअरलाइन्सने सांगितले की ते सोमवारपासून पुढील सूचना येईपर्यंत कराकसला जाणारी उड्डाणे रद्द करत आहेत. कंपनी परिस्थितीचे मूल्यांकन करेल आणि त्या देशात उड्डाणे कधी सुरू करायची याचा निर्णय घेईल. अमेरिकेच्या या इशाऱ्यानंतर जगाची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे.