
अमेरिका, इस्रायल-इराण युद्ध आता तीव्र होत आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणमध्ये सैन्य पाठवणार का? यावर जगभरात चर्चा होत आहे. ट्रम्प यांनी या प्रकरणी बरीच गुप्तता बाळगली असली तरी, उपग्रहांच्या नजरेतून काहीही सुटलेले नाही. अलीकडील उपग्रह प्रतिमांनी खळबळ उडवून दिली आहे. असे वृत्त आहे की, २,२०० प्राणघातक नौसैनिकांनी सुसज्ज असलेले अमेरिकेचे नवीन युद्धपोत, यूएसएस त्रिपोली, आखाती देशाकडे रवाना झाले आहे. हे जहाज सध्या दक्षिण हिंद महासागरात हिंदुस्थानजवळ आहे. तज्ञांच्या मते, इराण युद्ध पुढील आठवड्यात एका नवीन आणि धोकादायक वळणावर पोहोचू शकते.
प्रसारमाध्यमांनी ट्रम्प यांना या मुद्द्यावर विचारले , तेव्हा ते उपहासाने म्हणाले, मी कुठेही सैन्य पाठवत नाही आहे. जरी पाठवणार असलो तरी, मी कोणालाही सांगणार नाही. त्यांचे हे शब्द कितपत खरे ठरतात हे केवळ काळच ठरवेल. ट्रम्प त्यांच्या अनपेक्षित निर्णयांसाठी ओळखले जातात. अमेरिकेचे सुरक्षा अधिकारी असेही म्हणतात की, इराणमधील आपली मोहीम अधिक मजबूत करण्यासाठी ट्रम्प हजारो सैनिक तैनात करण्याचा गंभीरपणे विचार करत आहेत. त्यामुळे अमेरिकेचे नौसैनिक इराणमध्ये उतरणार आहेत का? हिंद महासागरात युएसएस त्रिपोली जहाजाच्या वेगाबरोबरच उत्सुकताही वाढत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांसमोर सैन्य पाठवल्याचे नाकारले असले तरी, २,२०० मरीन सैनिकांसह युएसएस त्रिपोली या युद्धनौकेचे मध्य-पूर्वेत आगमन वेगळेच संकेत देत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तेलमार्ग इराणच्या नियंत्रणातून मुक्त करणे आणि तेथे दफन झालेले युरेनियमचे साठे सुरक्षित करणे, हे ट्रम्प यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. जर हे सैन्य तैनात केले गेले, तर गेल्या दोन दशकांतील ही अमेरिकेची सर्वात मोठी लष्करी कारवाई ठरेल.
२८ फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाल्यापासून इराणने हार्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग रोखून धरला आहे, त्यामुळे जगभरात तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. इराणने हिंदुस्थान आणि पाकिस्तानकडे जाणाऱ्या काही टँकर्सना येथून जाण्याची परवानगी दिली असली तरी, त्यांनी पाश्चात्य जहाजांवर हल्ला करण्याची धमकीही दिली आहे. इतकेच नाही तर, ते आता येथून जाणाऱ्यांकडून मनमानी कर आकारत आहेत. एका टँकर ऑपरेटरने तर असा दावा केला आहे की, सुरक्षितपणे जाण्यासाठी त्याला जवळपास २० लाख डॉलर्स द्यावे लागले.
ट्रम्प यांची इच्छा आहे की त्यांच्या मित्र राष्ट्रांनी या मार्गाच्या संरक्षणासाठी युद्धनौका पाठवाव्यात, परंतु आतापर्यंत कोणताही महत्त्वपूर्ण प्रतिसाद मिळालेला नाही. अशा परिस्थितीत, यूएसएस त्रिपोली ट्रम्प यांचे हुकमी अस्त्र ठरू शकते. इराणच्या नौदलाचा मोठा भाग आधीच नष्ट झाल्यामुळे अमेरिकेसाठी ही कमी जोखमीची मोहीम असू शकते. काही अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की, ट्रम्प या मरीन सैनिकांचा वापर इराणची लहान बेटे ताब्यात घेण्यासाठी करू शकतात, जेणेकरून तेथून येणाऱ्या व्यापारी जहाजांचे संरक्षण करता येईल.
इराणकडे ९५० पाउंडपेक्षा जास्त उच्च-समृद्ध युरेनियम आहे, ज्याचा वापर अणुबॉम्ब बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. हे सर्व युरेनियम अमेरिका आणि इस्रायलने बॉम्बहल्ला केलेल्या तळांच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे. आता, हा खजिना सुरक्षित करण्यासाठी भूदलाची गरज भासेल. ट्रम्प सुरुवातीपासूनच ठाम आहेत की, कितीही किंमत मोजावी लागली तरी ते इराणला अणुबॉम्ब बनवू देणार नाहीत.
या पार्श्वभूमीवर आखातात यूएसएस त्रिपोलीचा (USS Tripoli) येथे प्रवेश अत्यंत महत्त्वाचा आहे. ती जपानमधील ओकिनावा येथे असलेल्या ३१ व्या मरीन एक्सपेडिशनरी युनिटचे २,२०० सैनिक घेऊन येत आहे. सीएनएनच्या (CNN) मते, हे सैनिक जमिनीवरील आणि हवाई युद्ध दोन्ही लढण्यात पारंगत आहेत. ही काही सामान्य युद्धनौका नाही, तर एफ-३५ (F-35) स्टेल्थ फायटर जेट्स आणि प्राणघातक हेलिकॉप्टरने सुसज्ज असलेला एक फिरता किल्ला आहे. जर ट्रम्प यांनी पुढच्या आठवड्यात हे सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेतला, तर गेल्या २० वर्षांत प्रथमच अमेरिकी सैन्य एका मोठ्या युद्धक्षेत्रात प्रत्यक्ष तैनात असेल.

























































