AI चा वापर गुन्हेगारीसाठी

> स्पायडरमॅन

AI अर्थात आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या आगमनानंतर त्याचे प्रचंड कौतुक झाले. त्याचे कारनामे बघून जग आश्चर्यचकित झाले होते. मात्र त्याच वेळी हे तंत्रज्ञान चुकीच्या हातात गेल्यास त्याचा वापर अनेक चुकीच्या गोष्टी करण्यासाठी होऊ शकतो असा इशारा जगभरातील अनेक सायबर तज्ञ देत होते. अगदी शेवटी तर या AI च्या निर्मात्यांनीदेखील आपण एक भस्मासुर निर्माण केला असल्याची कबुली देण्यापर्यंत वेळ आली. आता हळूहळू या तंत्रज्ञानाचा वापर गुन्हेगार कसा बेमालूमपणे करू लागले आहेत ते समोर यायला सुरुवात झाली आहे. उत्तर चीनमधल्या बाओटौ शहरात एका व्यक्तीला ‘डीप फेक’ तंत्रज्ञानाचा वापर करून 4.3 मिलियन युआन अर्थात जवळपास पाच करोड हिंदुस्थानी रुपयांना गंडा घालण्यात आला आहे.

या व्यक्तीला त्याच्या जवळच्या मित्राच्या नावाने व्हिडीओ कॉल करण्यात आला. त्याच्या मित्राचा चेहरा गुन्हेगाराने ‘AI डीप फेक’ अर्थात फेस स्वॅप (चेहरा बदलणारे तंत्रज्ञान) वापरून हा कॉल केला होता. आपण अत्यंत अडचणीमध्ये असून पैशांची तातडीची गरज असल्याची बतावणी या गुन्हेगाराने व्हिडीओ कॉलवर केली. त्याच्या भूलथापांना फसलेल्या सदर व्यक्तीने खरेच आपला मित्र अडचणीत आहे असे समजून तातडीने रक्कमदेखील पाठवली. मात्र त्यानंतर जेव्हा त्याने आपल्या या मित्राला प्रत्यक्ष पह्न कॉल केला, तेव्हा सदर मित्राने अशी कुठलीही रक्कम मागितल्याचे किंवा ती मिळाल्याचे सरळ नाकारले आणि हा फसवणुकीचा प्रकार उघड झाला.

सदर व्यक्तीने तातडीने पोलिसांकडे धाव घेतली आणि घडलेल्या फसवणुकीची माहिती दिली. पोलिसांनीदेखील त्वरेने कारवाई करत लुटल्या गेलेल्या रकमेपैकी बहुतांश रक्कम जप्त करण्यात यश मिळवले आहे आणि उर्वरित रकमेचा ते शोध घेत आहेत. मात्र या गुन्ह्यामुळे AI सारख्या अद्भुत तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्हेगार कुठपर्यंत मजल मारू शकतात आणि निष्पाप लोकांना लुबाडून शकतात या चिंतेत आता जगभरातील सायबर सुरक्षा यंत्रणा पडलेल्या आहेत.