अयोध्येतील श्रीराम मंदिर बॉम्बने उडवण्याची जैश-ए-मोहम्मदची धमकी

अयोध्येतील श्रीराम मंदिर बॉम्बने उडविण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. यावेळी ही धमकी दहशतवादी जैश ए मोहम्मदने दिली आहे. याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यूपी सरकारने अलर्ट जारी केला आहे. रामनगरीत तैनात असलेल्या सुरक्षा पथकांना सतर्क करण्यात आले आहे. अलर्टनंतर अयोध्येत श्रीराम मंदिर परिसरात सर्व ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. रामललाच्या दर्शन मार्गावरही भाविकांवर पाळत ठेवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धमकी देण्यात आलेल्या ऑडिओमध्ये आमिर नावाचा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी बोलतोय. आमच्या मशिदीला हटवून मंदिर बनवले आहे. आता हे मंदिर बॉम्बने उडविण्यात येईल, अशी धमकी दिली आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणा त्या ऑडियोचा तपास करत आहे. केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारच्या सर्व संस्था हायअलर्टवर आहेत.

अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिराला बॉम्बने उडविण्याची धमकी याआधीही दोन ते तीन वेळा दिली होती. मागच्या वर्षीही धमकी देण्यात आली होती. याआधी 2005 मध्ये अयोध्येमध्ये दहशतवादी हल्ल्याची धमकी देणारा जैश ए मोहम्मदचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर तत्काळ सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. तसेच रेल्वे स्टेशन, विमानतळ आणि बसस्टॅण्डवर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली.