उत्तर प्रदेशात ‘लव्ह जिहाद’च्या घटनेचा दावा; जमावाचा पोलीस ठाण्याला घेराव

उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये लव्ह जिहादची घटना घडल्याचा दावा करण्यात येत आहे. बरेलीतील एक मुलगी 17 ऑक्टोबरला बेपत्ता झाली होती. तिला पळवून नेत दुसऱ्या समाजातील तरुणाने तिच्याशी जबरदस्तीने विवाह केल्याचा आरोप मुलीच्या कटुंबियांनी केला आहे. तसेच ही ‘लव्ह जिहाद’ची घटना असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यानंतर भाजप आणि विश्व हिंदू परिषेदच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घालत मुलीच्या सुटकेची मागणी केली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

मुलीच्या कटुंबियांनी हे ‘लव्ह जिहाद’ चे प्रकरण असल्याचा दावा केल्यानंतर मुलीने स्वतःचा व्हिडीओ जारी केला आहे. आपण सज्ञान असून आपल्या इच्छेनुसार येथे आलो आहोत. आपल्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करण्यात आलेली नाही. मुलीने व्हिडीओ जारी केल्यानंतर मुलगी घरातून आठ लाख रुपये आणि सोन्याचे दागिने घेऊन गेली आहे. त्यामुळे तिच्या जीवाला धोका असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. तसेच हा व्हिडीओ तिच्याकडून जबरदस्तीने बनवून घेतल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.

मुलीच्या कुटुंबियांनी केलेल्या ‘लव्ह जिहाद’च्या दाव्यामुळे भाजप आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घालत निदर्शने केली. मुलीला पळवून नेले असून तिची तातडीने सुटका करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. कार्यकर्त्यांकडून निदर्शने सुरुच असल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे पोलीस ठाण्यातील काही शिपायांना निलंबित करण्यात आले आहे.

मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची फसवणूक करत तिला जबरदस्तीने पळवून नेण्यात आले आहे. तसेच धोक्याने तिचे लग्न लावण्यात आले आहे. मुलाने मुलीवर लग्नासाठी जबरदस्ती केल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच सोशल मीडियावरील अनेक फोटोंवरून हे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण असल्याचे स्पष्ट होत असल्याचे विश्व हिंदू परिषद आणि इतर संघटनांनी म्हटले आहे.

आपली मुलगी बीएससीला असून ती संगणकाच्या कोचिंगसाठी जात होती. ती नेहमीप्रमाणे 17 ऑक्टोबरला कोचिंगसाठी गेली होती. ती घरी परतलीच नाही. तिचा शोध घेण्यात आला. त्यानंतर एका मुलाने तिला पळवून नेण्याची माहिती मिळाली, असे मुलीच्या वडिलांनी सांगितले. मुलीने घरातून आठ लाख रुपये आणि सोन्याचे दागिनेही नेले आहेत. त्यामुळे तिच्या जीवाला धोका आहे. तसेच ही लव्ह जिहादची घटना असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. या प्रकरणामुळे आणि पोलीस ठाण्याबाहेर करण्यात आलेल्या निदर्शनांमुळे बरेलीत तणावाचे वातावरण आहे. उत्तर प्रदेशात याआधीही ‘लव्ह जिहाद’च्या घटनांमुळे तणाव निर्माण झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या